लोहारा (ता. पाचोरा, जि. जळगाव प्रतिनिधी)- ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा सुंदर संगम जपत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालय, लोहाराने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील तब्बल १० विद्यार्थ्यांनी मेरिट यादीत स्थान मिळवून शाळेसह पालक आणि परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.

विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर हे यश मिळविले असून, या यशामागे मुख्याध्यापक श्री. पी. एम. सुर्वे, उपमुख्याध्यापक श्री. आर. जी. बैरागी तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन व अथक परिश्रम असल्याची भावना व्यक्त होत आहे.

मेरिटमध्ये स्थान मिळविणारे विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत :

– बनकर लोकेश प्रकाश – २१० गुण (७०%)

– सोनवणे कमलेश श्रीराम – २०८ गुण (६९.३३%)

– जाधव चेतश्री प्रकाश – २०२ गुण (६७.३३%)

– भोसांडे दुर्वेश अमोल – २०२ गुण (६७.३३%)

– देशमुख यश सागर – २०२ गुण (६७.३३%)

– भिवसने हितांशी गजानन – २०० गुण (६६.६६%)

– क्षीरसागर गायत्री गोपाल – १९८ गुण (६६%)

– भिवसने ईशानी पांडुलिक – १९८ गुण (६६%)

– लोहार कल्पेश गणेश – १९२ गुण (६४%)

– चौधरी निशा गजानन – १९२ गुण (६४%)

विद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी नियमित सराव परीक्षा, विषयनिहाय विशेष मार्गदर्शन, वैयक्तिक शंकानिरसन, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासवर्ग आणि सातत्यपूर्ण मूल्यमापनावर विशेष भर देण्यात आला. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्याचेच रूपांतर आजच्या दैदिप्यमान यशात झाले.

मुख्याध्यापक श्री. पी. एम. सुर्वे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता सातत्याने उंचावली आहे. विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, शिस्तबद्ध वातावरण आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनामुळे विद्यालयाने परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. उपमुख्याध्यापक श्री. आर. जी. बैरागी यांच्यासह सर्व शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देत वेळोवेळी प्रेरणा दिल्याने हे यश शक्य झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.


यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले असून, भविष्यातही अशीच यशाची परंपरा कायम राखण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा देणारे शिक्षक, सहकार्य करणारे पालक आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विद्यालय भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.








