बोदवड-(प्रतिनिधी) – तालुक्यातील नागरिकांची पूर्णवेळ तहसीलदारासाठी असलेली प्रतीक्षा आता अखेर थांबणार आहे. अक्राणी तालुक्याचे (जि. नंदुरबार) तहसीलदार ज्ञानेश्वर पंडित सपकाळे यांची बोदवड येथे तहसीलदार म्हणून बदली झाली असून, ते लवकरच पदभार स्वीकारणार असल्याचे बोलले जात आहे.
बोदवड तहसीलदाराचे पद गेल्या अनेक दिवसांपासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली होते. परिणामी, तालुक्यातील नागरिकांच्या महसूल संबंधित समस्यांमध्ये वाढ झाली होती. रेशनकार्ड, उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा विचार, अनुदानाचे पंचनामे आणि इतर शासकीय कागदपत्रे काढताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे अनेक कामांना विलंब होत होता.

आता मात्र पूर्णवेळ व समर्पित तहसीलदार मिळणार असल्याने नागरिकांना होणारा हा त्रास पूर्णपणे थांबणार आहे. नवनियुक्त तहसीलदार ज्ञानेश्वर पंडित सपकाळे यांच्याकडून नागरिकांच्या प्रलंबित कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यामुळे बोदवड तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शासकीय आदेशानुसार बदली:

महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय यांच्या शासन आदेश क्र. बदली-२०२५/प्र.क्र.२१५/आस्था-३ नुसार श्री. ज्ञानेश्वर पंडित सपकाळे यांची बोदवड येथे बदली झाली आहे. ते अक्राणी तालुक्याचे (जि. नंदुरबार) तहसीलदार म्हणून कार्यरत होते.











