लोणवाडी ग्रामपंचायत ; घरकुल यादीतून लाभार्थ्यांचे नाव वगळले, प्रोसिडींग बुक मध्ये खाडाखोड;RTI मध्ये उघड

सरपंच, ग्रामसेवका विरुद्ध पोलीस अधीक्षकांकडे तक्रार


लोणवाडी, ता. जळगाव- (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील लोणवाडी गावातील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे नाव वगळल्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून लाभार्थीच्या मुलाने सरपंच, ग्रामसेवक व सरपंच पती विरुद्ध थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार अर्ज दिल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, जळगाव तालुक्यातील लोणवाडी गावात पंतप्रधान आवास योजना अंतर्गत
कमलाबाई शिवाजी चव्हाण (बेलदार) यांचे नाव ऑफलाईन यादीत ‘ड’ यादीत ४१ क्रमांकावर असताना ऑनलाईन यादीत अचानक गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दरम्यान या बाबत ग्रामसेवक यांना अर्जदार यांनी विचारणा केल्यानंतर नाव कसे गायब झाले याबाबत समाधानकारक माहिती देऊ न शकल्याने जाणीवपूर्वक नाव वगळल्याचा संशय निर्माण झाला होता. यानंतर लाभार्थी यांचा मुलगा अॅड. अरूण शिवाजी चव्हाण यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, जळगाव कार्यालयाकडे तक्रार व माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये अर्ज करून माहिती मागितली होती त्यानुसार अरुण चव्हाण यांना माहिती प्राप्त झाली असता ग्रामपंचायतीतील ठरावमध्ये खाडाखोड व संशयास्पद नावे कमी केल्याचे दिसून आल्याची तक्रार करण्यात आली आहे.

लाभार्थ्यांच्या मुलगा अरुण चव्हाण यांनी पंचायत समिती, जळगाव कार्यालयाकडून माहिती मागितली असता ग्रामपंचायतीचा जानेवारी महिन्यातील ठराव क्र. 8/1 मध्ये स्पष्टपणे 30 नावे घरकुल यादीतून वगळण्यात आल्याचे दिसते मात्र, अनुक्रमांक 31 व 32 लहान अक्षरात दोन नावे वाढवण्यात आले, ज्यामुळे नामनिर्दिष्ट लाभार्थ्याचे नाव गायब झाले.मात्र ऐकून वगळलेली संख्या 30 नमूद आहे. यामुळे 31 आणि 32 नंबर असलेली दोन नंतर वाढवण्यात आली असा गंभीर आरोप व तक्रार अरुण चव्हाण यांनी केली आहे.

दरम्यान अरुण चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीमुळे सरकारी दस्तऐवजांमध्ये खाडाखोड उघडकीस आली आहे. लाभार्थ्यांच्या मुलाने थेट पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार केली असून ग्रामसेवक रघुनाथ चव्हाण, सरपंच अनिता बळीराम धाडी व त्यांचा पती बळीराम तुकाराम धाडी यांच्यावर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे

घरकुलासाठी अर्ज आणि अन्याय

कमलाबाई चव्हाण यांनी सन 2005 पासून लोणवाडी शासकीय जागेत राहत असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला होता. ऑफलाईन सर्वे यादीत त्यांचे नाव अनुक्रमांक 41 वर असल्यामुळे त्यांना घरकुलाचा लाभ मिळण्यास पात्र ठरले.

तथापि, ग्रामसेवक व सरपंच यांनी पैसे मागितले व न दिल्यास घरकुल मिळणार नाही अशी धमकी दिल्याचे पत्रात नमूद आहे. लाभार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी गटविकास अधिकारी कार्यालयाकडे ई-मेल द्वारे लेखी तक्रार केली होती.

प्रशासनाकडे तक्रार, न्यायाची मागणी

कारवाईची अपेक्षा

पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने लाभार्थ्यांचे मातीचे घर धोक्यात आहे. या घटनेमुळे योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तरी तात्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी अरुण चव्हाण यांनी केली आहे.










