जळगाव – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य वीर एकलव्य आदिवासी अधिकारी/कर्मचारी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव येथील प्राध्यापक प्रा. डॉ. शाम दामू सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कन्नड, जिल्हा संभाजीनगर येथे दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी संघटनेची राज्य वार्षिक सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध गायकवाड (वैद्यकीय अधीक्षक, कन्नड शासकीय रुग्णालय) होते. तसेच, राज्य सरचिटणीस प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड (भडगाव), राज्याच्या कार्याध्यक्ष सौ. छायाताई विष्णू पवार (तहसीलदार, जालना) आणि प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती नलिनी सोनवणे (निवृत्त एकात्मिक बालविकास अधिकारी) यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सरचिटणीस प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी संघटनेने केलेल्या कार्याचा लेखाजोखा (अहवाल) सादर केला. समाजासाठी आणि संघटनेसाठी प्रा. डॉ. शाम सोनवणे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध गायकवाड यांनी त्यांची जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. तसेच, श्री. दिलीप आनंद सिंग महाले (शिक्षक, कस्तुरबा माध्यमिक शाळा, चोपडा) यांची जळगाव जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.

या सभेसाठी राज्य कार्यकारिणीचे सर्व उपाध्यक्ष, पदाधिकारी, तसेच विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष बर्डे यांनी केले, तर राज्य सरचिटणीस प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.










