
जळगाव – (प्रतिनिधी) – नशिराबाद येथील रहिवासी आणि जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेले ॲड. प्रविण रंधे यांनी जळगाव जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत ३६८ मतांच्या मताधिक्याने सदस्यपदी विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयानंतर नशिराबाद आणि वकील वर्गात आनंदाचं वातावरण आहे.

सतत संघर्षांची साथ लाभलेले ॲड. रंधे हे गरीब कुटुंबातून आलेले असून त्यांनी अतिशय बिकट परिस्थितीत त्यांचे मोठे बंधु प्रदीप रंधे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण पूर्ण करून विधीक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. न्यायालयीन प्रॅक्टिस करताना त्यांनी नेहमीच न्यायासाठी झगडणाऱ्या सामान्य जनतेची साथ दिली आहे.

या निवडणुकीत त्यांनी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि वकिलांच्या हितासाठी कार्य करण्याच्या जाहीर वचनांसह प्रचार केला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि लोकसंपर्काला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला.

विजयानंतर प्रतिक्रिया देताना ॲड. रंधे म्हणाले, “हा विजय केवळ माझा नाही, तर सर्व सहकारी वकिलांचा आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी पूर्ण पारदर्शक व समर्पित कामगिरीने सार्थ ठरवीन. जिल्ह्यातील वकिलांच्या समस्या सोडवणे, त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणे, आणि जिल्हा बार असोसिएशनचे कार्य अधिक गतिमान करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट राहील.”

त्यांच्या या विजयाबद्दल नशिराबाद परिसरात आणि जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, हा विजय संघर्षातून यशाकडे नेणाऱ्या वाटचालीचं प्रतीक ठरत आहे.











