अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

निवास, भोजन, उपचार आणि सुरक्षित परतीच्या प्रवासाची सर्व व्यवस्था युद्धपातळीवर

जळगाव- (जिमाका) – उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात अयोध्या–प्रयागराज महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात जळगाव जिल्ह्यातील भाविक जखमी झाल्यानंतर जळगाव जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदत कार्य सुरू केले आहे. अपघातानंतर जखमी व सुरक्षित सर्व भाविकांना प्रशासनाने रेल्वेच्या स्वतंत्र रिझर्वेशन बोगीद्वारे परतीच्या प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कालच अयोध्या येथील अपघाताची माहिती घेऊन तातडीने प्रशासनाला जखमी भाविकांना सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाद्वारे युद्धपातळीवर समन्वय साधून मदतकार्य केले जात आहे.

यासाठी जळगाव जिल्हा प्रशासन, सुलतानपूर जिल्हा प्रशासन, लखनऊ रेल्वे विभाग, भुसावळ मध्य रेल्वे विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी तत्काळ समन्वय साधून भाविकांसाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या. जखमी व सुरक्षित भाविकांची एक दिवसाची निवास व भोजन व्यवस्था करून त्यांना स्वतंत्र रिझर्वेशन बोगीपर्यंत सुरक्षित पोहोचविण्यात आले.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ सर्व विभागांशी समन्वय साधून भाविकांना मदतकार्य करीत आहेत.

या अपघातात पिंप्राळा, जळगाव येथील छोटीबाई शरद पाटील (वय ५५) यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृतदेहाला जळगावला आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ॲम्बुलन्सची व्यवस्था केली असून आज दुपारी त्यांचा मृतदेह पिंप्राळा येथे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

जखमी भाविकांवर सुलतानपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. सर्व भाविक प्रवासी सुखरूप परतीच्या प्रवासात असून ते उद्या दुपारी ४ वा. पर्यंत जळगाव व भुसावळ रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहेत. धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी भाविकांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचविण्यासाठी सतत संपर्कात आहेत.










