
पाळधी/जळगांव(प्रतिनीधी)- येथील सुर्या फाऊंडेशन संचलित नोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये पतंगोत्सव व पालक मातांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांना घरची दैनंदिन कामे नेहमीच असतात त्यात त्यांना बदल मिळावा व लहान मुलांसोबत लहान बनुन जगावे या उद्देशाने हा कार्यक्रम शाळेमार्फत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जळगांव मनपा माजी महापौर सिमा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अलका पाटील, संगिता कासट, शाळेच्या अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी उपस्थित होते. याप्रसंगी जमलेल्या सर्व पालक मातांना शाळेच्या वतीने सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारुन सर्व मातांमधुन विजेत्या ठरलेल्या माता पालकाला संक्राती क्वीन म्हणून पैठणी व मुकुट देऊन गौरवण्यात आले. यावेळी सर्व मुलांनी आपल्या आईचे पाय धुवून औक्षण करून स्वागत केले. राधिका उपाध्याय, विजया मोरे, गुणवंत पवार आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.












