
धानोरे —(प्रतिनिधी) – शहराच्या जवळ असूनही भौगोलिक अडचणींमुळे विकासापासून काहीसे दूर राहिलेले धानोरे गाव आजही विविध सामाजिक समस्यांना सामोरे जात आहे. गावाच्या शेजारी असलेल्या नदीमुळे हे शेवटचे गाव ठरते आणि नदीपलीकडील गावांशी संपर्क तुटतो. या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरण व आरोग्यविषयक जनजागृती अत्यंत महत्त्वाची ठरते.

याच उद्देशाने लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव आणि अभेद्या फाऊंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने क्षेत्रकार्य प्रशिक्षणार्थींनी धानोरे गावात मासिक पाळीविषयी जनजागृती व सॅनिटरी पॅड्स वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले. महिलांमध्ये असलेल्या मासिक पाळीशी संबंधित अस्वच्छता, गैरसमज व अज्ञान या समस्यांची दखल घेत हळदी-कुंकवाच्या पारंपरिक कार्यक्रमाच्या माध्यमातून या संवेदनशील विषयावर सकारात्मक संवाद साधण्याचा अभिनव प्रयत्न करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अभेद्या फाऊंडेशनच्या संचालिका वैशाली झालटे मॅडम उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धानोरे गावाच्या सीआरपी मालुबाई विराजमान होत्या. यावेळी लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयातील मार्गदर्शक प्रा. डॉ. नितीन बडगुजर व प्रा. डॉ. योगेश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेचे महत्त्व, आरोग्यविषयक काळजी, तसेच समाजातील गैरसमज दूर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. डॉ. योगेश महाजन यांनी महिलांना सामाजिक बांधिलकी, स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूकता व महिलांच्या हक्कांविषयी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ, पारंपरिक उखाणे तसेच सामाजिक जाणीव वाढवणारे उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांचा लाभ धानोरे गावातील अनेक महिला व मुलींनी उत्स्फूर्तपणे घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा मोरे यांनी केले. मोना निरखे यांनी प्रास्ताविक मांडले, तर गायत्री कुंभार यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी गांगुर्डे सुनील उत्तम, रेहाना तडवी, ज्योत्स्ना महाजन, प्राची सरोदे तसेच इतर स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला विकास व आरोग्यासाठी उचललेले हे पाऊल भविष्यात निश्चितच सकारात्मक बदल घडवेल, असा विश्वास व्यक्त करत वैशाली झालटे, प्रा. डॉ. नितीन बडगुजर व प्रा. डॉ. योगेश महाजन यांनी प्रशिक्षणार्थींचे कौतुक व अभिनंदन केले. शेवटी महिलांना सॅनिटरी पॅड्सचे वितरण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.










