कोरोना संकटात जिल्ह्यात ४ लाख ३६ हजार मास्कची निर्मिती; महिला बचत गटांना मिळाले ४२ लाख ५५ हजारांचे उत्पन्न
नाशिक, दि.27 – दर उन्हाळ्यात वाळवणाच्या पदार्थांतून लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बचतगटांपुढे यंदा कोरोना महामारीच्या संकटाने मोठा पेच निर्माण केला होता. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ‘आपत्तीतून इष्टापत्ती’ साधत या बचतगटांतील महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून मास्क निर्मितीचा मंत्र दिला आणि पाहता पाहता या लघुउद्योगाने संपूर्ण जिल्ह्याला एक प्रकारे कोरोनाशी लढण्यासाठी ‘सुरक्षा कवच’च तयार करून दिले. आज जिल्ह्यातील २५३ बचत गटांनी तब्बल ४ लाख ३६ हजार मास्क निर्मिती केली असून, त्यापैकी ४ लाख ३३ हजार मास्कची विक्री केली आहे. त्यातून तब्बल ४२ लाख ५५ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने २५ मार्च २०२० रोजी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले. या लॉकडाऊनमुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अनेकांचे रोजगार गेले. उन्हाळ्यात वाळवणं तयार करुन लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बचतगटाच्या हाताचेही काम गेले. गटातील महिलांचाही उपजीविकेचा प्रश्न उभ राहिला. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी या बचत गटांना ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणावर मास्क तयार करून त्याची विक्री करावी, असे आवाहन करून बचतगटाच्या काम करणाऱ्या महिलांमध्ये एक ऊर्जा निर्माण केली. जिल्ह्यातील २५३ बचतगटांनी लीना बनसोडे मॅडमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आजपर्यंत ४ लाख ३३ हजार मास्कची विक्री करून ४२ लाख ५५ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.

मास्क निर्मितीतून बचतगटांनी मोठे काम उभे केले

बचत गटांच्या चळवळीवर आणि त्यांच्या कामावर माझा पूर्ण विश्वास आहे. गेल्या १२ वर्षांपासून मी या बचत गटांचे काम खूप जवळून पाहिले आहे. त्यात सहभाग घेतला आहे. करोना संकटसमयी मला खात्री होती की, बचत गटांच्या माध्यमातून आपण खूप मोठे काम उभे करू शकतो. आमच्या आवाहनाला महिलांनीही प्रतिसाद दिला. त्यांच्या हातांनाही काम मिळाले, रोजगार मिळाला. खास करून त्यांचा आत्मविश्वासही वाढला. – लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.


सामाजिक बांधिलकीतून उपजिविका :

कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी मास्क गरजेचा आहे. आज घराबाहेर पडणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसतो. मात्र मास्क वापराची जनजागृती करीत असताना जाणविले की ग्रामस्तरावर मास्कचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. त्यामुळे तालुकास्तरावरुन बचत गटांना मास्क तयार करण्याचे काम देऊन त्यांची उपजीविका साधण्याचा सुवर्णमध्य जिल्हा परिषदेने साधला.

प्रबोधन करणाऱ्या वर्गाला मास्कची आवश्यकता :

कोरोनापासून बचाव कसा करावा याबाबत प्रबोधन करण्यासाठी जिल्ह्यात साडेतीन हजार आशा, ७३९ आरोग्य सेविका, ३२८ आरोग्य सेविका व ९ हजार १०६ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. या सर्वांना मास्क अत्यंत गरजेचे असल्याने स्वयंसहायता समूह बचत गटांकडून मास्क तयार करण्यात आले व बचतगटांनी देखील चांगला प्रतिसाद दिला.

तालुकानिहाय मास्कची विक्री व उत्पन्न :

जिल्ह्यातील १५ तालुक्यामध्ये निफाड तालुका अग्रेसर असून, या तालुक्यातील केवळ ११ बचतगटांनी ९३ हजार ८९० मास्कची विक्री करून ३ लाख ४४ हजार रुपये उत्पन्न मिळविले आहे. या तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी बचतगटांना कापड व दोरा उपलब्ध करून त्यांना आवश्यक तो मोबदला दिला. तसेच नाशिक तालुक्यातील बचत गट उत्पन्न मिळविण्यात अग्रेसर असून, २४ बचतगटांनी ५७ हजार मास्कची विक्री करून त्यातून ६ लाख ७९ हजार एवढे उत्पन्न मिळविले आहे. चांदवड तालुक्यात ८० हजार ३५० मास्कची विक्री झाली असून, त्याद्वारे ३ लाख ७८ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे. बागलाण तालुक्यात २७ हजार मास्कची विक्री झाली करून त्यातून तीन लाख ५० हजाराचे उत्पन्न मिळविले. देवळा तालुक्याने ७ हजार मास्कची विक्री करून त्यातून ४४ हजार ५५७ रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. दिंडोरी तालुक्याने ३२ हजार १०० मास्कची निर्मिती करून ५ लाख ९३ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे. इगतपुरी तालुक्याने १८ हजार ७७५ मास्कची विक्री करून त्यातून २ लाख ७३ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे.

कळवण तालुक्यातील बचतगटाने ९ हजार ७५० मास्कची विक्री करून १ लाख ४८ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे. मालेगाव तालुक्यात २२ हजार १८३ मास्कची विक्री करून त्यातून ३ लाख १८ हजाराचे उत्तन्न मिळविले आहे. नांदगाव तालुक्याने २८ हजार ४६५ मास्कची विक्री केली असून त्यातून ४ लाख ७० हजार ९०० इतके उत्पन्न मिळविले आहे. पेठ तालुक्याने ७ हजार ८७० मास्कची विक्री करून १ लाख ३२ हजार इतके उत्पन्न मिळविले आहे. सिन्नर तालुक्याने १७ हजार मास्कची विक्री करून २ लाख १६ हजार इतके उत्पन्न मिळविले आहे. सुरगाणा तालुक्याने ८ हजार ५५५ मास्कची विक्री करून १ लाख २१ हजार इतके उत्पन्न मिळविले आहे. येवला तालुक्यातील बचतगटांनी १७ हजार ८६० मास्कची विक्री करून १ लाख ४१ हजार हजार इतके उत्पन्न मिळविले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्याने ६ हजार ४०० मास्कची विक्री करून ९० हजार ५०० रुपये इतके उत्पन्न मिळविले आहे.

लक्षणीय :

- जिल्ह्यात १५ तालुक्यातील उपक्रम
- २५३ बचत गटांचा समावेश
- ४ लाख ३६ हजार मास्कची निर्मिती
- ४ लाख ३३ हजार ४२८ मास्कची विक्री
- ४२ लाख ५६ हजार रुपयांचे उत्पन्न










