लोहारा (प्रतिनिधी: ईश्वर खरे): पाचोरा तालुक्यातील म्हसास येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कुमारी सृष्टी गजानन पाटील हिने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली आहेत. ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर शहीदी समारंभाच्या अनुषंगाने आयोजित या स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल सृष्टीचा जळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्कार स्वीकारताना पाचोरा गटशिक्षणाधिकारी श्री. विजय पवार, उपशिक्षक श्री. पंकजकुमार पालीवाल आणि सृष्टीचे पालक उपस्थित होते.

सृष्टीच्या या यशात शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर जाधव सर, पंकज पालीवाल सर, रोकडे सर, बोरसे सर आणि सूर्यवंशी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा परिषद शाळेतील एका ग्रामीण विद्यार्थिनीने जिल्हास्तरावर मारलेली ही धडक कौतुकास्पद ठरत असून, तिच्या या यशाबद्दल म्हसास आणि लोहारा परिसरातील सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










