शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी नाट्यचळवळ महत्वाची : परिसंवादातील सुर
_रंगभूमी दिनानिमित्त आनंदयात्रीतर्फे विशेष परिसंवादाचे आयोजन

जामनेर – (प्रतिनिधी) – आनंदयात्री संस्थेमार्फत ‘शहराचा सांस्कृतिक चेहरा काल, आज आणि उद्या ‘ या विषयावर आयोजित परिसंवादात शहरातील जेष्ठ रंगकर्मी व साहित्यिकांनी नाट्यचळवळीच्या संवर्धनाची गरज महत्वाची असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘नटराज पूजन’ करून परिसंवादास सुरुवात करण्यात आली.
यावेळी जेष्ठ रंगकर्मी प्रा सुधीर साठे, पत्रकार मोहन सारस्वत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक नाना लामखेडे, तावडी बोलीचे अभ्यासक डॉ अशोक कोळी यांनी सहभाग घेतला. जेष्ठ रंगकर्मी प्राचार्य डॉ अरविंद चौधरी अध्यक्षस्थानी होते.
प्रा सुधीर साठे यांनी जामनेर शहरातील सांस्कृतिक चळवळीचा प्रदीर्घ इतिहास मांडला. शहरातील जुन्या नाट्य चळवळीचा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक नाना लामखेडे यांनी नाटकात काम करण्याची संधी प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी सहेतूक प्रयत्न कारणे आवश्यक असून शाळा महाविद्यालयातून नाट्यशिबीरे घेतली जावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.
साहित्यिक डॉ अशोक कौतिक कोळी यांनी बदलत्या जगाबरोबर लयास जात असलेली वाचन संस्कृती जोपसण्यासाठी भावी पिढीला पुस्तकांशी मैत्री करण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे असून साहित्याशी नातं जोडणारे उपक्रम राबविण्यासाठी विविध संस्थांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे मत मांडले.

जेष्ठ पत्रकार मोहन सारस्वत यांनी विविध लोककलांचे संवर्धन व्हावे, तसेच आपल्या शहराला चित्रकलेचा देखील मोठा वारसा लाभलेला आहे. तरुणांना आपल्या या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख व्हावी यासाठी साहित्य संमेलने, नाट्य-चित्र शिबीरे यांची योजनाबद्ध अंमलबजावणी व्हावी असे विचार मांडले.
परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ अरविंद चौधरी यांनी शहरात सांस्कृतिक चळवळीच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे तसेच शहराच्या वैचारिक जडणघडणीसाठी नियमित व्याख्यानमाला, विविध प्रशिक्षण शिबीरे आयोजित केली जावीत. तसेच स्थानिक कलावंतांनी निर्मिती कडे ही वळावे असा मौलिक सल्ला दिला.
परिसंवादाचे सूत्रसंचालन गणेश राऊत यांनी तर आभार डॉ चंद्रशेखर पाटील यांनी मानले.यावेळी आनंदयात्रीचे डॉ अमोल सेठ, सुहास चौधरी, डॉ राजेश सोनवणे, प्रा कडू माळी, डॉ आशिष महाजन,डॉ पराग पाटील, प्रा नितीन पाटील, अमरीश चौधरी, भाऊराव पाटील, डॉ गिरीश पाटील आदी उपस्थित होते. या विशेष उपक्रमासाठी शहरातील जिनियस इंटरनॅशनल स्कुलचे अनमोल सहकार्य लाभले.










