<
जळगांव(चेतन निंबोळकर)- कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूची साखळी तोडण्यासाठी सरकारने संपूर्ण देश लॉकडाउन करुन अत्यावश्यक असेल तर घराबाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच दिवसेंदिवस राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यावर शासनाने एकमेव उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास सांगितले आहे. सोशल डिस्टन्सिंग हे फक्त जळगांव शहरात उत्तम पाळले जात असून तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र सोशल डिस्टन्सिंगला तसेच शासनाच्या नियमांना फाट्यावर मारले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वडली या गावात स्वस्त धान्य दुकानावर सरकारच्या आदेशानुसार गावातील लोकांना धान्याचे वाटप सुरू होते. मात्र, हे करताना लोकांच्यात सुरक्षित अंतर राहील अथवा लोक गर्दी करणार नाहीत याची काळजी संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराने घेणे गरजेचे होते. तर येथे धान्य घेण्यासाठी लाभार्थ्यांची एकच गर्दी उसळून आल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. सदर दुकानदार इंदू सदाशिव ठाकूर यांनी लोकांना सोशल डिस्टन्सच्या कोणत्याही सुचना केल्या नसल्याचे दिसून आले. गावातील सुरक्षेच्या दृष्टीने लोकांच्यात सुरक्षित अंतर राहील अथवा लोक गर्दी करणार नाहीत याची काळजी संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराने घेणे गरजेचे होते. तसेच धान्य घेते वेळी येथील लाभार्थ्यांनी स्व-सुरक्षेच्या दृष्टीने तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधल्याचे दिसून आले नाही. एका छोट्याशा खेड्यात ते शक्य ही झाले असते. मात्र, प्रत्यक्ष तसे काहीच न केल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करुन सरकारच्या कोरोना रोखण्याच्या मोहिमेला हरताळ फासण्याची कृती केल्याचे दिसून आले. त्यामुळे काही स्थानिकांनी भिती व्यक्त करुन बेफिकिरपणे स्वस्त धान्याचे वाटप करणार्या त्या दुकानदारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. जिल्हा प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाने सुरवातीपासून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना प्रतिसादही चांगला मिळाला. पण आता प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. पुन्हा एकदा प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागणार आहेत. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाही तर अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तत्काळ प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी जनमाणसातुन होत आहे.
धान्य कमी देत असल्याच्या तक्रारी
सदर रेशन दुकानदार इंदू सदाशिव ठाकूर या लाभार्थ्यांना कमी अन्नधान्य देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ देण्याचे शासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, जिल्हा अन्नपुरवठा अधिकाऱ्यांनी जळगांव तालुक्यातील वडली येथील स्वस्त धान्य दुकानात तांदूळ पाठविले. पण येथील स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्यांना चक्क ४ किलोच तांदूळ देत आहे. सदर गावात अनेक कुटुंबे शेती, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असतात. यातच लॉकडाउन मुळे सर्व बंद असल्याने ते सद्यस्थितीत स्वस्त धान्य दुकानावर अवलंबून आहे. या काळात सदर स्वस्त धान्य दुकानदाराकडून धान्य कमी मिळत असल्याने त्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. सदर स्वस्त धान्य दुकानाची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून चौकशी होऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.