<
मोहा,प्रतिनिधी(हर्षवर्धन मडके)
कळंब तालुक्यातील मोहा येथील लॉकडाऊनकाळात विद्युतपुरवठा सुरळीत चालू असल्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
मोहा ३३/११ सबस्टेशन अंतर्गत लॉकडाऊन काळात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असताना देखील तारतंत्री रामचंद्र येवले आणि राकेश बागडे हे आपला जीव धोक्यात टाकून जनतेला सुरळीत वीजपुरवठा करून अप्रत्यक्षरीत्या घरात बसण्यास मदत करत आहेत. मोहा परिसरात मागील २२ तारखेपासून कर्फ्यु सदृश परिस्थिती चालू असुन मेडिकल, रास्त भाव दुकाने, किराणा दुकाने वगळता इतर आस्थापना बंद आहेत. त्याचबरोबर सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या ०५ टक्क्यांपर्यंत आणली आहे. त्यामुळे नियमित करण्यात येणाऱ्या कार्यावर याचा विपरीत परिणाम जाणवत आहे. त्यानुसार मोहा गावात वीज सेवा देणारे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. ३३/११ चे उपकेंद्र आहे. त्यामध्ये ही लॉकडाऊन परिस्थितीमुळे कर्मचारी कपात करावे लागत असून कमी मनुष्यबळावर जास्तीचा कामाचा व्याप पडत आहे. त्यातूनही महावितरण कर्मचारी यांनी ड्युटीवर असतानाचे सर्व प्रॉब्लेम तात्काळ सोडवण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. त्यामुळे पुढे चालून प्रलंबित कामाचा व्याप अचानक उद्भवणार नाही. त्यानुसार गावात काही प्रॉब्लेम उद्भवला तर तात्काळ परमिट घेऊन तो सोडवला जात आहे जेणेकरून वीज नसल्याचे कारण सांगून नागरिक घराबाहेर पडणार नाहीत. आजवर असुविधा, ओव्हरलोड, वीजचोरी आदी समस्येने ग्रासलेल्या महावितरणने संकटसमयी उचितसेवा देऊन एकप्रकारे जनसेवा करत असल्याचे जाणवत आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत याप्रकारेच नियोजन ठेऊन नागरिकाना घरातच बसवण्याचे कार्य महावितरण कडून करण्यात यावे अशी निपक्ष अपेक्षा सुज्ञ नागरिक वर्तवित आहेत.