<
जळगाव(प्रतिनीधी)- दूरवरचे बघत असतांना जवळच्यांचा विसर पडतो असं नेहमी म्हटलं जातं. आणि जवळचे विस्मृतीत जातात. कोरोनाविरूध्दच्या लढाईत समाजातील काही घटक आपल्या विस्मृतीत गेले आहेत याचं भान राखत पवित्र रमजानचा महीना व खानदेशातील मोठा सण आखाजी या सणासुदीच्या पूर्वसंध्येला कृती फाऊंडेशन”ने समाजातील काही विस्मृतीत राहीलेल्या सुमारे ५० कुटुंबांना महीनाभर पुरेल एव्हढ्या दैनंदिन किराणा सामानाचे वाटप केले.
तसेच थालेसेमिया पिडीत बालकांच्या पालकांना आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. समाजातील हे घटक नेहमीच आपल्या अवतीभवती आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात.कोणत्याही अपेक्षेशिवाय ही मंडळी आपली सेवा देत मदत करीत असतात.एकही दिवस त्यांची सेवा नाही मिळाली तर, आपण अस्वस्थ होतो. समाजातील अशा घटकांची सद्यस्थितीत परवड होत असतांनाही संकोचामुळे किंवा लाजेपोटी ते मदतीची गरज असूनही मदत मागायला पुढे येत नाहीत. अशा घटकांना हेरून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून व माणुसकीचा भाव जपत या कुटुंबियांना मानवतावादी भावनेने कृती फाऊंडेशन”ने मदत करीत एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे. या उपक्रमाची संकल्पना “कृती”चे अध्यक्ष प्रशांत महाजन,सचिव जी.टी.महाजन, पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी “कृती”च्या महीला आघाडीच्या प्रमुख सरीता महाजन यांच्या नेतृत्वाखाली डॉ श्रद्धा माळी, तन्वी देशमुख, स्मिता देवरे, विनीता महाजन, स्वाती मोहीते, संपदा माळी निलम बेल्हेकर, वैशाली महाजन, हिमांगी मोहीले जागृती महाजन व शैला माईनकर यांच्या सहकार्याने राबविली तर विनोद पाटील, उषा रामदास, राकेश लांडगे, जयेश महाजन किशोर मोहिते यांनी केलेल्या आर्थिक योगदानामुळे हा उपक्रम पूर्णत्वास आला.