<
जळगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन व संचारबंदी लागू झाली आहे. याआदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ३ हजार २४२ गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिली आहे. तसेच मास्क न वापरणाऱ्या ३४३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत देशभर लॉकडाऊन घोषित केलेला आहे.
लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने लॉकडाऊनच्या कालावधीत काही निर्बंध घालून दिलेले आहेत. तरी सुध्दा जिल्ह्यातील काही नागरिक बेफिकिरपणे वागत असून स्वत: बरोबरच दुसऱ्यांच्याही जीवाला कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहेत. याला आळा घालण्यासाठी पोलिस दलाकडून अशा व्यक्तींवर कारवाईची धडक मोहिम हाती घेतलेली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात विविध कारणांनी भारतीय दंड विधान संहिता कलम १८८, २६९, २७० आणि २९० तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा २ ते ४ सह आपत्ती व्यवस्थापन कलम ५४(४) आदींचे उल्लंघन करणााऱ्या ३ हजार २४२ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ड्रोन कॅमेºयाचा वापर
त्याचबरोबर जिल्ह्यातील चेकपोस्ट, प्रतिबंधित क्षेत्र, कंटोन्मेंट झोन व महत्वाच्या, गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावून तेथील नागरीकांमध्ये जनजागृती करणे, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा वेळेत होण्यासाठी हेल्पलाईनच्या माध्यमातून मदत करणे, लॉकडाऊनच्या काळात नागरीकांनी मास्क लावणेबाबत जनजागृती करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे. बाजार समितीच्या व इतर गर्दीच्या ठिकाणी होणाºया गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेर्याचा वापर करुन बंदोबस्ताची आखणी करणे, आदी विविध उपाययोजना पोलीस दलातर्फे राबविण्यात येत आहे. नागरिकांनीही लॉगडाऊनच्या नियमांचे पालन करुन घरातच रहावे, आवश्यकता भासल्यास स्वत:ची सुरक्षितता पाळूनच घराबाहेर पडावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.