<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 28 – जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासन सर्वातोपरी प्रयत्न करीत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहेत. प्रशासनाच्या उपाययोजनांना नागरीकांच्या सहकार्याची जोड आवश्यक आहे. याकरीता नागरीकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत घरात राहून सुरक्षित रहावे. जेणेकरुन आपण कोरोनाचा प्रादुर्भाव निश्चितपणे रोखू शकू. असा आशावाद राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात विशेषत: अमळनेर शहर व तालुक्यात कोरानाचे रुग्ण वाढत आहे. ही बाब लक्षात घेता पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज अमळनेर शहरास भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली, या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल पाटील, नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील, प्रांताधिकारी सिमा अहिरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ गिरीश गोसावी, वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे, नगरसेवक प्रताप शिंपी, माजी आमदार साहेबराव पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री पुढे म्हणाले की, अमळनेर तालुका हा धुळे व नंदूरबार जिल्ह्याच्या सीमवेरील तालुका आहे. या दोन्ही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यातच मालेगाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरल्याने तालुकावासियांना अधिक काळजी घ्यावी लागणार. या भागातून तालुक्यात कोणीही येणार नाही याची दक्षता घ्या. पोलीस विभागाने तालुक्याच्या सीमेवरील तपासणी कडकोट करावी. तालुक्यातील नागरीकांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आल्यास तातडीने तपासणी करुन घ्यावी. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हाच उत्तम पर्याय असल्याने नागरीकांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे. मात्र इतर आजाराच्या रुग्णांना लॉकडाऊनचा त्रास होणार नाही याचीही दक्षता घेण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी यंत्रणेला दिल्यात.
अमळनेर येथून डायलेसिससाठी अनेक रुग्ण धुळेला जातात परंतु लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदी असल्याने त्यांना उपचार घेण्यास अडचण येत असल्याचे तसेच तालुक्यातील नागरीकांना आगामी खरीप हंगामासाठी बीयाणांची अडचण येवू नये असे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले असता अशा रुग्णांची यादी स्थानिक पोलीसांना देऊन त्यांना आवश्यक तो परवाना स्थानिक पातळीवरच मिळावा यासाठी पालकमंत्री यांनी पोलीस विभागास सूचना दिल्यात. तर बीयाणांबाबत कृषि विभागाला आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्याचे पालकमंत्री यांनी बैठकीत सांगितले. त्याचबरोबर भविष्यात अमळनेर तालुक्यास पाणीटंचाई भासणार आहे. याकरीता पांझरेचे आरक्षित पाणी सोडण्याचा प्रश्न आमदार स्मिताताई वाघ यांनी मांडला असता याबाबत जलसंपदा मंत्र्यांशी बोलून हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न व पोलीसांच्या मदतीला होमगार्ड दिल्यास होमगार्डचे वेतन नगरपालिका देईल असे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी सांगितले असता याबाबत नगरविकास मंत्री यांचेशी चर्चा करण्यात येईल तर होमगार्ड उपलबध करुन देण्याबाबत प्रशासनाला सुचना देण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
अमळनेर शहरातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी नागरीकांना घरपोच जीवनावश्यक वस्तु देण्याबाबत नगरपालिकेने केलेल्या नियोजनाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. तसेच नगरपालिका क्षेत्रात सीसीटीव्ही बसविणे, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेला आर्थिक मदत देण्याबाबतही संबंधितांना सुचना देण्यात येतील. त्याचबरोबर प्रंतिबंधित क्षेत्रात मे व जून महिन्याचे धान्य वाटपाचे नियोजन आतापासूनच करण्याच्या सुचनांही पालकमंत्र्यांनी महसुल विभागास दिल्या.
शिवभोजन केंद्रास पालकमंत्र्यांची भेट
यावेळी पालकमंत्र्यांनी बाजार समिती जवळील शिवभोजन केंद्रास भेट देऊन गरजु व गरीबांना शिवभोजन थाळीचे वाटप केले. त्यानंतर त्यांनी ढेकुरोडवरील फोर्टस येथील भाजीपाला विक्री केंद्राला भेट दिली. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे चांगल्याप्रकारे पालन होत असल्याने पालकमंत्र्यांनी या केंद्राच्या चालकाचे कौतुक केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते नागरीकांना भाजीपाल्याचे वितरणही करण्यात आले. तसेच अमळनेर तालुक्यातील गरजू व गरीबांना भानूबेन बाबूलाल शहा गोशाळेतर्फे दररोज जेवणाचे वाटप करण्यात येते याठिकाणीही पालकमंत्री यांनी भेट देऊन त्यांचा मुलगा जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या गोशाळेला एक दिवसाच्य जेवणाचा खर्च रुपये 1 लाख 10 हजार रुपयांची मदत केली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा धनादेश पालकमंत्र्यांकडे सुपूर्द
यावेळी जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्था, जळगाव यांचेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51 हजार रुपयांची मदत करण्यात आली. या मदतीचा धनादेश संचालक मंडाळाने पालकमंत्री यांचेकडे सुपूर्द केला.