<
कळंब,तालुका प्रतिनिधी (हर्षवर्धन मडके)
कोविड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना लॉकडाऊनच्या कालावधीत संपूर्ण राज्यात सिमा/हद्दी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी आदेश पारित केले आहेत. कोरोना (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात अनधिकृत रित्या प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यांचा सीमांवर तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये तसेच प्रत्येक शहरांच्या सीमांवर चेक पोस्टची स्थापना करण्यात आली आहे. या चेक पोस्ट वर पोलिस विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी यांचेकडून येणाऱ्या/जाणाऱ्या नागरिकांची विचारपूस करून त्यांची माहिती घेण्यात येत आहे व इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना जिल्ह्यात येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे व तरीही इतर जिल्ह्यातून येणारे लोक चुप्या मार्गाचा अवलंब करून जिल्ह्यात प्रवेश करत आहेत असे निदर्शनास आले आहे.
सद्यस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यात आढळून आलेले को (कोविड-१९) चे रुग्ण बरे झाले असून जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. तथापि इतर जिल्ह्यातून अनाधिकृतरित्या छुप्या मार्गाचा अवलंब करून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांमध्ये जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात अनधिकृतरित्या प्रवेश केलेल्या व यापुढे अनाधिकृत पणे येणाऱ्या नागरिकांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. अनाधिकृत पणे प्रवेश करणाऱ्या नागरिकांना १४ दिवस संस्थात्मक विलगिकरण करण्यात येणार आहे. तसेच २००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. अनधिकृत पणे प्रवेश केलेल्या व्यक्तीची माहिती लपवल्यास त्याच्या पूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल होणार आहे तसेच अनधिकृत प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर पोलिस विभागाकडून गुन्हे दाखल होणार आहेत.