<
मालेगाव: कोरोना विषाणूचे थैमान रोखण्यासाठी शासन स्तरावरुन मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. मालेगाव शहरातील रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून यासाठी मालेगावातील रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य सुविधेसह नागरिकांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज केले.
मालेगाव शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, आवश्यक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, महापौर ताहेरा शेख, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ.आरती सिंग, सहायक जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक डॉ.पंकज आशिया, आरोग्य उपसंचालक पठाण शेट्टी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, महानगरपालिकेचे आयुक्त त्र्यंबक कासार, उपायुक्त नितीन कापडणीस, माजी आमदार आसिफ शेख, माजी महापौर रशिद शेख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मंत्री श्री.टोपे म्हणाले, इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईनसाठी आवश्यक सोयीसुविधांमध्ये स्वच्छ पाणी व पोषक आहार, स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसह तज्ज्ञ डॉक्टरांची टिम व त्यांच्यासाठी लागणाऱ्या पीपीई किट व पुरेसा औषधसाठा या सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यात येईल. नाशिकमध्ये तपासणी लॅब कार्यान्वित झाल्यामुळे दररोज 200 चाचण्या करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यापुढे 24 तासात अहवाल प्राप्त होणार असल्यामुळे रुग्णांवर तात्काळ उपचार मिळतील, परिणामी रुग्णांची घरवापसी मोठ्या प्रमाणात होवू शकेल.
खाजगी रुग्णालये तात्काळ कार्यान्वित करा
मालेगाव शहरातील जवळपास 150 खाजगी रुग्णालये आहेत. ती तात्काळ सुरु करण्याचे आवाहन करताना मंत्री श्री.टोपे म्हणाले, रुग्ण डॉक्टरांमध्ये परमेश्वर शोधत असतांना डॉक्टरांनी रुग्णालय बंद करुन घरात बसणे उचित नाही. नॉन कोवीड रुग्णांची हेळसांड होणार नाही यासाठी सर्व खाजगी डॉक्टरांनी त्यांच्या ओपीडी तात्काळ कार्यान्वित कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर शहरातील किमान चार ते पाच खाजगी रुग्णालयात थोडेफार लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांसाठी सोय उपलब्ध करुन त्यांना देखील पीपीई किट पुरविण्यात येतील असेही ते यावेळी म्हणाले.
येत्या दोन दिवसात फिवर क्लिनीक सुरु करणार
नॉन कोवीड रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचे सांगत मंत्री श्री.टोपे म्हणाले, येत्या दोन दिवसात फिवर क्लिनीक सुरु करण्यात येईल. त्याच बरोबर सामान्य रुग्णालय नॉन कोवीड करण्यात आले असून आज तेथील परिस्थितीचाही आढावा घेतला आहे. तेथे आवश्यक सुविधेसह डॉक्टर्स, नर्सींग स्टाफसह स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपलब्धता तात्काळ करुन देण्यात येईल. असेही ते म्हणाले.
आपल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून शासनामार्फत देण्यात आलेला प्रोटोकॉल व देण्यात आलेल्या सुचनांचे प्रत्येक नागरिकांनी काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. आज आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीचा मुकाबला करतांना आपसातील मतभेद, बाजूला सारुन एकत्रितपणे आलेल्या सामाजिक संकटाचा मुकाबला करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
लॉकडाऊनची अंमलबजावणी प्रभावीपणे करा : कृषीमंत्री दादाजी भुसे
लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत असल्याचे सांगत राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले, आज पोलीस प्रशासनातील काही पोलीस कर्मचारी कोवीड विषाणूमुळे बाधित झाले आहेत. त्याचबरोबर आरोग्य सेवेचे व्रत घेतलेले काही डॉक्टर देखील रुग्णांची सेवा करतांना बाधित झाले आहेत. यांच्या कर्तव्यदक्षतेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर कोरोनाला हरविण्यासाठी वेळ लागणार नाही. कोरोना विषाणूसारख्या महामारीला थोपविण्यासाठी नागरिकांचे देखील सहकार्य गरजेचे असून एकजुटीने कोरोनाला हरवू या, असे भावनिक आवाहन मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले.
सर्व प्रथम मालेगाव येथील जीवन हॉस्पिटल व सामान्य रुग्णालयात भेट देवून तेथील डॉक्टर्स व नर्सींग स्टाफशी मंत्री श्री.टोपे यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना शुभेच्छा देवून त्यांचे मनोबल वाढविण्याचे कामही त्यांनी यावेळी केले. शासकीय विश्रामगृहात उपस्थित सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सर्वांच्या समस्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाणून घेतल्या. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येवून प्रभावी उपाययोजना शासन स्तरावरुन राबविण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.