<
एक तीळ सात जणांनी वाटून खाण्याची, आपल्याकडे असलेल्या एक भाकरीतील अर्धी भाकरी समोरच्या उपाशी माणसाला देण्याची आपली भारतीय संस्कृती. आपण ज्या सामाजात राहतो त्या समाजाचे आपल्यावर अनंत उपकार असतात. या समाजाचे आपण काही देणे लागतो ही आपली शिकवण. या भावनेतूनच जळगाव येथील भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्यावतीने लॉकडाऊनच्या काळात गरीब व गरजू नागरीकांसाठी ‘स्नेहाची शिदोरी’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन जाहिर केला आहे. लॉकडाऊनचे राज्यात तंतोतंत पालन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन, शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार विविध उपाययोजना राबवित आहे. हे करीत असतांना जिल्ह्यातील कोणीही नागरीक उपाशी राहणार नाही याकडेही प्रशासन विशेष लक्ष देत आहेत. जिल्ह्यातील गरीब व गरजू नागरीकांना अवघ्या पाच रुपयात शासनाच्या शिवभोजन थाळीचा लाभ देण्यात येत आहे. परंतु लॉकडाऊनमुळे ज्यांचा रोजगारच बंद झाला आहे अशा नागरीकांना दोनवेळेचे जेवण उपलब्ध व्हावे. याकरीता जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांना आवाहन केले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोणीही नागरीक उपाशीपोटी राहू नये याकरीता उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रसाद मते यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. प्रशासनाच्या आवाहनास जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती भरभरुन प्रतिसाद देत असून दररोज सुमारे 10 हजारपेक्षा अधिक गरजूंना मोफत जेवण उपलब्ध करुन देण्यात आले. त्यातील एक म्हणजे जैन इरिगेशन होय.
लॉकडाऊनच्या काळात समाजातील तळागाळातील कुटुंबांना उपाशी झोपण्याची वेळ येऊ नये, त्यांना आपल्याकडून काही मदत व्हावी हा उदात्त विचार जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन व जैन बांधवांनी केला. गोरगरीबांसाठी काही भोजनाची व्यवस्था व्हावी त्यादृष्टीने जैन इरिगेशन ‘स्नेहाची शिदोरी, थेट गरजूंच्या दारी’ हा आगळावेगळा उपक्रम 2 एप्रिलपासून राबवित आहे. या उपक्रमातंर्गत सकाळच्या जेवणात कडधान्याची भाजी, चार चपाती असे सुमारे 5500 अन्नाची पाकीटे तर सायंकाळी मसाला भाताची सुमारे 3500 पाकिटे गरजवंतांपर्यंत संस्थेच्या माध्यमातून पोहोचविले जात आहेत. आजमितीस सुमारे दोन लाख जणांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे जे कोरोना वॉरियर्स आहेत त्यातले पोलीस, नर्स, डॉक्टर व अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांपर्यंत जैन कंपनीचे हेल्थ ड्रिंक, विविध फळांचा ज्युस देखील पाठविला जात आहे. अन्नाची पाकीटे पोहोचविण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवक शहरातील झोपडपट्टी, अनाथालये, वृद्धाश्रम आदि ठिकाणी दुपारच्या व रात्रीच्या जेवणाच्या वेळेपर्यंत ही पाकिटे पोहोचवितात. शहराच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गरजवंतापर्यंत अवघ्या तास दीड तासात ही ‘स्नेहाची शिदोरी’ संस्थेमार्फत पोहोचविली जात आहे.
याशिवाय जिल्ह्यात व शहरातही अनेक संस्था गरजूंना मदत करीत आहे. नाथ फाऊंडेशनच्यावतीने शहरातील निवारागृहातील मजूरांना जेवण व इतर मदत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच रेडक्रॉस सोसायटी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, व्यंकटेश देवस्थान, रोटरी क्लब, भरारी फाऊंडेशन, संपर्क फाऊंडेशन, रॉबिनहूड फाऊंडेशन, मणियार बिरादरी, विश्व मानव रुहानी केंद्र, अमर शहीद संत कवरराम ट्रस्ट, शिवसह्याद्री प्रतिष्ठाण, नाशिराबाद, अलफैज फाऊंडेशन या व इतरही अनेक सेवाभावी संस्था, सामजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी हे शंभर ते एक हजारापर्यंत जेवणाची पाकिटे गरजूंना दररोज वाटप करीत आहे. या विविध संस्थांच्या माध्यमातून जळगाव शहरात दररोज दहा हजारपेक्षा अधिक गरजू व गरीबांना जेवणाच्या पाकिटाचे वाटप करुन त्यांची भूक भागविली जात आहे.
तसेच लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये याकरीता शहरातील ज्या भागात गरजू व गरीबांना जेवणाची आवश्यकता असेल तेथील दैनंदिन माहिती घेऊन त्याठिकाणी सामाजिक संस्थामार्फत जेवण पाठविण्याचे नियोजन नोडल अधिकारी प्रसाद मते हे या संस्थांशी संपर्क करुन करीत आहेत. तसेच त्याठिकाणी वेळेवर जेवण पाठविण्यासाठी त्यांची टिम झटत आहे.
याचबरोबर जिल्ह्यातील गरजवंताना जीवनावश्यक वस्तुंचे किट वाटप करुन अनेक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आपले योगदान देऊन सेवाभाव जपत आहे. हे सर्व करीत असताना लॉकडाऊनच्या नियमांचा कुठलाही भंग होणार नाही किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे त्यांचेही पालन करण्यावर या संस्थांचा भर आहे. या संस्थांचा सेवाभाव तसेच जेवण बनविण्याची पध्दत, जेवणाचा दर्जा, स्वच्छता, वाटपाची पध्दत जाणून घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी व इतर मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन या संस्थांच्या कार्याचे कौतूक केले आहे.
विलास बोडके
जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव