<
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ३ मे पर्यतच्या देशभरातील लॉकडाऊनमुळे वृत्तपत्र वाटप करणाऱ्या मुलांचा रोजगार बंद झाल्याने त्यांच्या परिवारावर अडचण ओढवून आली आहे.
सामाजिक बांधिलकीतुन अशा गरजुंना कृती फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला. या वृत्तपत्र वाटप करणाऱ्या मुलांच्या कुटुंबांकरिता तांदूळ, गहू, साखर, तेल, डाळ, चहापुडा, मिरची मसाला, साबण आदी सोशल डिस्टन्सींग, मास्क व स्वच्छतेबाबतचे सर्व निकष पुर्ण करुन अतिशय शिस्तबध्दपणे किराणा किटचे वाटप कृती फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. प्रसंगी कोरोनासारख्या संकटामध्ये सामाजिक दायित्व म्हणून अतिशय स्तुत्य उपक्रमाची संकल्पना सुजित माळी, डी.टी.महाजन व पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी मांडली तर फाउंडेशन अध्यक्ष प्रशांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी अनिल येवले, केतन शिंदे चाळीसगाव हेड पोस्ट ऑफिस अधिकारी व कर्मचारी यांच्या आर्थिक मदतीने हा उपक्रम पूर्णत्वास आला. याबद्दल वृत्तपत्र विक्रेता मंडळाचे उपाध्यक्ष नितीन चौधरी यांच्याकडून फाउंडेशनचे आभार मानण्यात आले. इतर सामाजिक संस्थांनी देखील तसेच समाजातील नागरिकांनी या उपक्रमाचा आदर्श घेत लाॅकडाऊनच्या काळात सर्वांना मदत करावी अशी अपेक्षा सुध्दा यावेळी व्यक्त केली. प्रसंगी शीतल अहिरे, अर्चना मोहिते, तेजस देशमुख, चेतन महाजन, मिलिंद महाजन, सुरेश देवरे, श्रेयस महाजन, फिरोज शेख, चेतन निंबोळकर आदी उपस्थित होते.