<
जळगाव दि. 2 (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील अमळनेर -4, भुसावळ-5, पाचोरा-3, अडावद-1, जळगाव शहरातील मारोतीपेठ व समतानगर असे 2 असून जिल्यातील 15 ठिकाणं आज प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.
या पूर्वीच प्रशासनाने ज्या-ज्या ठिकाणी Containment Zone घोषित करण्यात येईल. त्या त्या ठिकाणचे/क्षेत्रातील/परिसरातील बँकेतील सर्व अंतर्गत कामकाज सुरळीपणे सुरु राहील. तथापि, संबंधित बँकांचे व्यवहार ग्राहकांसाठी/नागरीकांसाठी सुरु असणार नाहीत. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.
करोना विषाणू (कोव्हिड 19) च्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणे/क्षेत्रे Containment Zone घोषित करण्यात आलेले आहे. याठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून Containment Zone अंतर्गत येणारे सर्व बँकींग व्यवहार देखील बंद केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
कंटन्मेंट झोन (Containment Zone) अंतर्गत येणाऱ्या बँकांनी ग्राहकांना जास्तीत जास्त ऑनलाईन सुविधा पुरविण्याबाबत प्राथम्याने कार्यवाही करावी. ग्राहकांना घरपोच सुविधा (उदा. बँकमीत्र, पोस्ट खात्यामार्फत सुविधा) देण्याचा प्रयत्न करावा. Containment Zone अंतर्गत येणाऱ्या बँकेतील सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करुन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच बँकेत हॅण्डवॉश, सॅनिटाईजर्स व हात धुण्यासाठी व्यवस्था करण्याचे निर्देशही डॉ ढाकणे यांनी बँकांना दिले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील. असे डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.