<
जळगांव(प्रतिनिधी)- निराधारांना आधार, गरीब शालेय विद्यार्थी दत्तक घेणे, आरोग्य शिबीर भरवणे, पर्यावरण, रक्तदान सारख्या राष्ट्रीय कार्यात आणि सामाजिक कार्यात आघाडीवर असणाऱ्या कृती फाऊंडेशनने जिल्हाभरात आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यातच सध्या संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणू धुमाकूळ घालत आहे. यात कृती फाऊंडेशन आपली कुठलीही कसर न सोडता जिल्ह्यात अनेकांना मदतीचा हात देताना दिसत आहे. असेच सामाजिक कर्तव्यभावनेने कृती फाऊंडेशनच्या वतीने जळगांव शहरातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांना कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने मास्क वितरण करण्यात आले.
यावेळी त्यांनी शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस, एम. जे. कॉलेज पोस्ट ऑफीस तसेच डाक अधिक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना फाऊंडेशन अध्यक्ष प्रशांत महाजन आणि कार्याध्यक्ष व पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी मास्क वितरीत केले. यात पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी काउंटरवर कार्य करीत असल्याने तसेच पोस्टमन वर्गास टपाल वितरीत करण्यासाठी बाहेर फिरावे लागत असल्याने स्व-सुरक्षेकरिता मास्क आवश्यक आहे. या दृष्टीने त्यांना फाऊंडेशच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी माधुरी महाजन, मनिषा रणधीर, चेतन निंबोळकर आदींचे सहकार्य लाभले.