<
कळंब, तालुका प्रतिनिधी(हर्षवर्धन मडके)
कळंब तालुक्यातील मोहा येथे पावसा अभावी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली असताना पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू आहेत.गावामध्ये पाण्याचे अपुरे स्रोत असल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाणीटंचाईच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी गावातील काही जलदुत पुढे सरसावले आहेत.पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ नागरिकांवर आली असल्यामुळे येथील परिस्थिती पाहून मोहा गावचे माजी सरपंच बाबा मडके यांनी ६००० लिटर क्षमता असलेले एक टँकर तसेच तंटामुक्ती अध्यक्ष निरंजन दत्त पाटील,तंटामुक्ती उपाध्यक्ष अंकुश (तात्या) मडके, उद्धव(नाना) मडके यांनी ६००० लिटर क्षमता असलेले एक टँकर तसेच राजमुद्रा ग्रुप चे अध्यक्ष अनंत मडके आणि दादा बाबुलाल शेख यांनी १२००० लिटर क्षमता असलेले एक टँकर सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून चालू केले. या टँकर चे उद्घाटन मंगळवारी दि(५) रोजी करण्यात आले. गावपरिसरातील सर्व विहिरी कोरड्या पडल्याने तंटामुक्तीचे अध्यक्ष निरंजन दत्त पाटील यांनी आपल्या शेतातील दोन कूपनलिकेचे पाणी सरकारी विहिरीत सोडून गावाची तहान भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. निरंजन दत्त पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या शेतातील कूपनलिकेचे पाणी ग्रामस्थांना मोफत देत आहेत.तसेच मे महिन्यापासून पाटील यांच्या कुपनलिकांचे ग्राम पंचायतने अधिग्रहण केले आहे.कोरोना महामारीने जगावर थैमान घातलेले आहे, अशा बिकट परिस्थितीत प्रशासनाचे पाणीटंचाई वर दुर्लक्ष झालेले असताना मोहा गावाला जलदुतांचा सहारा भेटला आहे.सरपंच राजू झोरी यांनी या जलदुतांचे कौतूक करुन पाणी पुरवण्याचा उपक्रम इतरांनाही प्रेरणादायी असल्याचे नमुद केले.
या जलदुतांच्या मोफत पाणीपुरवठा टँकरच्या उद्घाटन प्रसंगी गावचे सरपंच राजू झोरी,माजी सरपंच बाबा मडके,तंटामुक्ती अध्यक्ष निरंजन दत्त पाटील, तंटामुक्ती उपाध्यक्ष अंकुश मडके, पोलिस पाटील प्रकाश गोरे, उद्धव मडके,अनंत मडके,सतीश जोशी,सलीम मोमीन,सुदर्शन मडके,जमीर शेख,योगेश कोरे,मनोज वीर,दादा बाबुलाल शेख इ. उपस्थित होते.