<
मुंबई प्रतिनिधी दि. ५-५-२०२०
मुंबई महानगराचा पाणीपुरवठा सुरळीत राखण्यामध्ये मोलाचे योगदान असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणी खात्याच्या कशेळी विभागातील सर्व कामगारांनी कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये खारीचा वाटा म्हणून एकूण १ लाख ११ हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये प्रदान केली आहे.
कोरोना विषाणूच्या संकटकाळात नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा अविरत प्रयत्न करत असताना त्याबरोबरीने इतरही नागरी सेवा-सुविधा सुरळीत राहण्यासाठी विविध विभाग अखंड कार्यरत आहेत. त्यापैकी एक म्हणजे जल अभियंता विभाग होय. कोरोना विरुद्धच्या लढाईत वैद्यकीय क्षेत्र, पोलीस प्रशासन यांच्या बरोबरीनेच तितकीच महत्त्वाची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छतादूत म्हणजे घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी आणि अविरतपणे पाणीपुरवठा करणारे जलदूत म्हणजे जल अभियंता विभागातील कर्मचारी पार पाडत आहेत.
अत्यावश्यक सेवेतील ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतानाच या कर्तव्याबरोबरच सामाजिक बांधिलकीची जोपासनादेखील कर्मचाऱयांनी केली आहे. मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बृहन्मंबई महानगरपालिका जल अभियंता खात्यातील नगरबाह्य क्षेत्रात कशेळी विभागात कार्यरत सर्व कामगारांनी मिळून एकूण रुपये १,११,०००/- (रुपये एक लाख अकरा हजार मात्र) एवढी रक्कम मुख्यमंत्री सहायत्ता निधीमध्ये जमा केली आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कशेळी जल विभागाचे प्रतिनिधी म्हणून सहाय्यक अभियंता श्री. जयंत खराडे यांच्या हस्ते तहसीलदार श्री. राजाराम तवटे यांचेकडे या रकमेचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) सुपूर्द करण्यात आला. यावेळी कामगार प्रतिनिधी म्हणून श्री. राजू भारमल, श्री. देवेंद्र गजरमल आणि श्री. आनंद खरात हे उपस्थित होते.