<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टी वार्ड, मुलुंड येथील पालिका कार्यालयाला भेट देऊन मुलुंडमधील एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला तसेच मुलुंडमधील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येबद्दल दुःख व्यक्त करुन या समस्येला कसे सामोरे जायचे, काय तोडगा काढता येईल याबद्दल सहाय्यक पालिका आयुक्त किशोर गांधी यांच्याशी चर्चा केली व आवश्यक त्या सूचना केल्या. प्रभाग समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, पालिकेचे टी वार्ड येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी महेंद्र शिंगणापूरकर, शिवसेना मुलुंड विधासभेचे उपविभाग प्रमुख दिनेश जाधव, सुनील गारे, कार्यालय प्रमुख सिताराम खांडेकर, शाखाप्रमुख आनंद पवार, चंद्रकांत शेलार, बाबा भगत, संजय दळवी, अभिजीत चव्हाण यांच्या उपस्थितीत येथे झालेल्या बैठकीत ताबडतोब योग्य त्या उपाययोजना करण्यासाठीचे निर्देश महापौरांनी दिले.
मुलुंड पश्चिम येथील इंदिरानगर, रामगड परिसरातील स्लम परिसरात काल मोठ्या प्रमाणात कोरोना पॉज़िटिव रुग्ण आढळून आल्याने मुलुंड मधील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप ठोंबरे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना टॅग करुन फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. या पोस्ट मध्ये रामगड मधील बिकट परिस्थिती महापौरांच्या नजरेस आणून दिली. दाटीवाटीने वसलेल्या या स्लम परिसरात १८ एप्रिलला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला, त्यानंतर येथील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली परंतु अद्यापही येथील परिसर ना सील केला गेला, ना बैरिकेडिंग केले गेले, ना साधा कंटेंटमेंन्ट झोनचा बैनर येथे लावण्यात आला. ही परिस्थिती फेसबूक पोस्ट द्वारे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घ्यानात आणून तातडीने येथे लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. या फेसबूक पोस्टची तत्काळ दखल घेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल मुलुंडच्या टी वार्ड कार्यालयाला भेट देवून सहाय्यक पालिका आयुक्त किशोर गांधी व इतर संबंधितांशी चर्चा केली व योग्य त्या सूचना दिल्या.
‘मुलुंडमध्ये फैलावत असणाऱ्या covid-19 संसर्गावर ताबा मिळवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर अतिशय महत्वपूर्ण चर्चा या बैठकीत झाली असून लवकरच त्याप्रमाणे पावले टाकून मुलुंडमधील कोरोनाबाधित रुग्ण संख्या शून्यावर आणण्यात येईल’ असे उपविभागप्रमूख दिनेश जाधव यांनी यावेळी सांगितले.