<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
भांडूप पश्चिम येथील लाल बहादुर शास्त्री मार्गावरील बंद अवस्थेत असलेल्या सनराईस रुग्णालयला आवश्यक त्या सर्व परवानग्या देवून पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला असून कोरोनायुद्धात आघाडीवर राहून लढणाऱ्या पालिका कर्मचारी व पोलिस कर्मचारी यांच्यासाठी या रुग्णालयाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भांडूप येथील ड्रीम मॉल मध्ये असलेल्या सनराईस रुग्णालयला गेल्याच आठवड्यात मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी भेट देवून संपूर्ण परिसराची पाहणी केली व त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. २७५ बेडची क्षमता असलेल्या या हॉस्पिटलला पुनरुज्जीवित करुन हॉस्पिटल मालकामार्फत चालविले जाणार आहे. या जागेला ताबा प्रमाणपत्र (OC), अग्निशमन दलाची एनओसी (Fire NOC) आणि पाण्याचे कनेक्शन अद्याप मिळालेले नाही आहे. पालिकेतर्फे या सर्व परवानग्या तातडीने देण्यात येणार असून पालिकेची क्षमता नसल्यामुळे हॉस्पिटल मालकामार्फतच हे हॉस्पिटल चालविले जाणार आहे.
आवश्यक ती सर्व वैद्यकीय उपकरणे, वेंटीलेटर्स आणि ऑक्सिजनची सुविधा येथे आधीपासून उपलब्ध असून या सर्व सुविधा चालू अवस्थेत आणि वापरण्यायोग्य आहे तसेच बाजूलाच असलेल्या रहिवासी वसाहतीत पालिकेतर्फे ५०० फ्लट्स घेण्यात आले असून त्यांचा विलगीकरणासाठी वापर केला जाणार आहे.
पालिकेच्या एस वार्डचे सहाय्यक आयुक्त संतोष धोंडे यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की ‘पालिकेतर्फे आवश्यक त्या सर्व परवानग्या, पाण्याचे कनेक्शन व इतर सुविधा देण्यात आल्या असून ड्रीम मॉलमध्ये असलेल्या अनेक गुंतागुंतीच्या समस्यांमुळे हे हॉस्पिटल पूर्ण तयार असूनही अद्याप चालू करण्यात आले नव्हते.’
सनराईस ग्रूप ऑफ हॉस्पिटलच्या डॉक्टर निकिता ट्रेहान यांनी सांगितले की हे हॉस्पिटल पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व सुविधा उभारण्यास डॉ मूफज्जल लकडावाला यांच्या सोबत प्राधान्याने सर्व कामे येथे चालू करण्यात आली असून पालिकेतर्फे ताबा प्रमाणपत्र मिळताच मानवहिताचा दृष्टिकोन ठेवून आम्ही हे हॉस्पिटल लगेच चालू करणार आहोत.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईच्या पूर्व उपनगरात पालिकेला कोरोना रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठी बेडची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे व त्यासाठीच बंद असलेली रुग्णालये ताब्यात घेवून ती चालू करण्यात येत आहेत व त्याच अनुषंगाने बंद अवस्थेतील सनराईस रुग्णालय चालू करण्यात येत असून पूर्व उपनगरातील कोरोना पॉज़िटिव रुग्णांना तेथे दाखल करुन घेण्यात येणार आहे. याआधी कुर्ला येथील भाभा हॉस्पिटल, गोवंडी येथील शताब्दी हॉस्पिटल, राजवाडी हॉस्पिटल अश्या ठिकाणी कोविड 19 च्या रुग्णांची सोय करण्यात आली आहे तसेच विक्रोळी येथील शुश्रूषा ग्रूपचे १०० बेडचे सुमन रमेश तुलसीयानी हॉस्पिटल आणि चेंबूर येथील जॉय हॉस्पिटल येथे कोविड 19 च्या रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे.