<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
मागील काही दिवसांपासून अत्यावश्यक सेवांच्या नावाने खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमुळे मुलुंड, भांडूप परिसरातील लॉकडाऊनचा फज्जा उडाला असल्याचे समोर येत असून येथील कोरोनाबाधित रुग्ण संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसत आहे. मध्यंतरीच्या काळात मुलुंड, भांडूप पोलिसांनी अवलंबलेल्या कडक धोरणात शिथिलता आणल्यानंतर नागरिकांमधील या बेफिकीर वृत्तीत अधिकच वाढ झाल्याचे दिसत असून रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
भाजीपाला, फळे, चिकन, मटण, मासळी, धान्य, खाद्यपदार्थ घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत असून या सर्व वस्तूंच्या दुकानाबाहेर, मासळी बाजारात मोठी गर्दी उसळलेली दिसते. बुधवार, रविवारच्या दिवशी चिकन घेण्यासाठी अर्धा किमीपर्यंत रांग पसरलेली असते. सरकारकडून सुरक्षित अंतर ठेवा, गर्दी करु नका असे वारंवार आवाहन करूनही सामान्य नागरिक खरेदीसाठी मोठी गर्दी करत आहेत. युवा वर्ग मोठ्या संख्येने विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरताना दिसत आहे. सध्या पोलिस देखील त्यांना हटकत नसल्याने यासर्वांचे अधिकच फावत आहे. त्यामुळे कामाशिवाय फिरणाऱ्या व रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांना पोलिसांनी पुन्हा एकदा लाठीचा प्रसाद देण्यास सुरुवात करावी, अशी मागणी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
मुलुंडमध्ये रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी भाजीपाला विक्री करणे पालिकेने बंद केले आहे, असे असूनही अनेक ठिकाणी भाजीपाला विकला जात आहे. मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनीतील मैदानात रोज एक भाजीपाला येवून धंदा लावत आहे. स्थानिकांनी यासंदर्भात पोलिसांकडे अनेकदा तक्रारी केल्या परंतु तात्पुरत्या स्वरूपात विक्री थांबवली जाते व पोलिस निघून गेले की परत चालू होते. या ठिकाणी अनेकदा गर्दी होते. अनेक किराणा दुकाने, अन्नपदार्थ विक्रीच्या दुकानात देखील नेहमीच गर्दी होत असते. एकाचवेळी अनेक जण दुकानात असतात. पोलिस येतात तेव्हाच नियम पाळले जातात व इतरवेळी लॉकडाऊनच्या नियमांना फाट्यावर मारले जाते. ही परिस्थिती मुलुंड, भांडूप मध्ये अधिक प्रमाणात दिसत असल्याने या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
मुलुंड, भांडूप येथील स्लम वस्तीत कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण अधिक आढळून येत असल्याने कोणतीही काळजी न घेता येथील नागरिक, युवा वर्ग बिनधिक्कत कामाशिवाय रस्त्यावर फिरत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पालिका प्रशासन व पोलिस हरतर्हेने प्रयत्न करत आहेत. जर अश्याच प्रकारे नागरिक, युवा पिढी कामाशिवाय बाहेर पडली आणि पोलिसांनी जर कडक धोरण अवलंबून कारवाई नाही केली तर लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात देखील कोरोना रुग्ण संख्या कमी होणे मुश्किल असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अपेक्षेप्रमाणे ३० मे पर्यंत कोरोना महाराष्ट्रातून हद्दपार होणे अशक्यच असल्याचे दिसत आहे.