<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
३ दिवसांपूर्वी मुलुंड पश्चिम येथील इंदिरा नगर व रामगड गोशाळा रोड या स्लम वसाहतीत कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्यानंतर प्रशासनातर्फे काल रामगड गोशाळा रोड व इंदिरा नगर परिसराला सील करण्यात आले असून बेरिकेडिंग करुन तेथील रहदारी बंद करण्यात आली आहे.
१८ एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आल्यानंतरही व गेल्या १५ दिवसांत सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण मिळत असूनही इंदिरा नगर व रामगड परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला नव्हता. दि ४ मे रोजी येथे एकाच दिवशी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले तरी प्रशासन हे दोन्ही परिसर सील करत नव्हते यामुळे मुलुंडमधील एक सामाजिक कार्यकर्ते प्रदीप ठोंबरे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना टॅग करत फेसबूकवर यासंदर्भात एक पोस्ट टाकली होती व महापौरांना यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याला अनुसरून महापौरांनी मंगळवारी पालिकेच्या टी वार्ड कार्यालयाला भेट देवून सहा. आयुक्त किशोर गांधी, प्रभाग समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, आरोग्य खात्याचे प्रमूख महेंद्र शिंगारपुरे व मुलुंड शिवसेना उपविभाग प्रमूख दिनेश जाधव, सुनिल गारे व शिवसेनेचे इतर पदाधिकारी यांच्या सोबत एक बैठक घेवून काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. त्यानंतर काल प्रशासनाने तातडीने हालचाल करुन इंदिरा नगर व रामगढ़ गोशाळा रोड परिसर सील केला व बेरिकेडिंग केले.