<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
मुलुंड पूर्वेस लोकमान्य टिळक रोडवर स्टेशन समोर पदपथ दुरुस्तीच्या कामास पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे काही काळ हे काम थांबविण्यात आले होते. पदपथाच्या खोदकामानंतर भर रस्त्यावर मातीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत, कर्ब स्टोन्स रस्त्यावरच टाकण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे रस्त्यावर विशेष वाहतूक नसली आणि नागरिकांची अतिरिक्त वर्दळ नसली तरीही पालिकेच्या कंत्राटदाराने सर्व नियम पाळूनच शिस्तबद्ध काम करणे जरूरीचे आहे परंतु हे होताना दिसत नाही आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असतानाही कंत्राटदाराचे कामगार काम करताना मास्क नाक व तोंड झाकेल असा न ठेवता हणुवटीवर ठेवून संसर्गाला आमंत्रण देत आहेत. लॉकडाऊनमुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी आहे तरीही काम चालू आहे त्याठिकाणी कोणीही पालिका अधिकारी किंवा कर्मचारी कामाचे पर्यवेक्षन करण्यासाठी येत नसल्यामुळे कंत्राटदाराच्या मर्जीने संपूर्णतः रामभरोसे काम चालू आहे. पालिकेच्या कंत्राटप्रमाणे सिमेंट, रेती योग्य प्रमाणात वापरले जात आहे की नाही हे बघायला कोणीही उपस्थित नसतो. खोदकाम आणि दुरुस्ती काम सुरु असताना पालिकेने निश्चित केलेल्या अटींचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. या कामांमध्ये शिस्तबद्धता आणण्याची गरज असून, नियमभंग करणार्यांवर पालिकेने कडक कारवाई करणे जरूरीचे आहे. महापालिकेच्या देखरेख पथकाकडून अशांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. लवकरच पावसाळाचा हंगाम चालू होणार असल्यामुळे त्यापूर्वी पालिका प्रशासनाने कंत्राटदारला सांगून रस्त्यांवरील हे मातीचे ढिगारे, कर्ब स्टोन्स उचलून एका बाजूला ठेवायला सांगून रस्त्याच्या टाकलेल्या टाकाऊ वस्तूंचा तात्काळ निपटारा होवून रस्ता मोकळा करणे आवश्यक आहे अन्यथा सर्वत्र चिखल होवून पदपथाचे व रस्त्याचे देखील नुकसान होवू शकते व त्यात पालिकेचे नुकसान होईलच त्याचबरोबर करदात्यांच्या पैश्यांचा देखील अपव्यय होवू शकतो.
पालिकेच्या टी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.