<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
मुलुंड येथील रेलवे ट्रॅकमधून व पूर्व द्रुतगती महामार्गावरून अनेक स्थलांतरित मजूर, कामगार आपल्या गावी जाण्यासाठी पायी चालत जातानाचे दृश्य गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दिसत आहे. एकाचवेळी मोठा समुदाय करुन न जाता दहा-वीसच्या समुदायाने हे स्थलांतरित मजूर संध्याकाळी ७ च्या नंतर किंवा भल्या पहाटे पाठीला बॅग लावून मुंबईतून त्यांच्या प्रांतात जाण्यासाठी निघत असल्याचे त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा समजले.
अंधेरी, साकीनाका, चेंबूर, गोवंडी, दारूखाना, वडाळा, इत्यादी मुंबईतील अनेक ठिकाणांहून निघालेल्या या मजुरांना वाटेत अनेक नाक्यावर पोलिसांकडून हटकले जाते परंतु थोडया वेळाने पोलिसांची नजर चुकवत हे पूढे मार्गस्थ होतात. ठाणे, भिवंडी, कल्याण, नाशिक करत जेथून पूढे जाण्यासाठी गाडी मिळेल तेथपर्यंत चालत जायचे किंवा पायी चालतच राहायचे या उद्देशाने हे उन्हातान्हाची, भुकेची पर्वा न करता वाट तुडवत असून गावी पोहचायचे हाच निश्चय त्यांनी केलेला आहे, असे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. पुढे काय करायचे हे जरी अद्याप ठरलेले नसले तरी येथे उपाशी व पैश्यांशिवाय राहण्यापेक्षा मुंबई सोडून गावी जायचे हाच सध्या मुख्य उद्देश असल्याचे सर्वांनी सांगितले. काही मजूर काल संध्याकाळी निघाले तर काही आज भल्या पहाटे गावाकडे जाण्यासाठी बाहेर पडले असून तेव्हापासून काहीही खाल्ले नसून कोठे जर मोफत बिस्कीट, अन्न वाटत असतील तर तेच खावून किंवा फ़क्त पाणी पिवून मार्ग कापत आहेत.
हाताला काम नाही, दोन वेळेला पोटभर अन्न नाही, हातात पैसे नाही, असलेले पैसे संपत आले त्यामुळे करायचे काय, उन्हाळ्याच्या दिवसांत पत्राच्या छोट्याशा खोलीत दहा-बारा जणांनी दिवसभर घरात कोंडून कसे राहायचे अश्या संभ्रमावस्थेत सापडलेले हे मजूर पोलिसांना चुकवत, मिळेल त्या रस्त्याने किंवा रेलवे ट्रॅक ओलांडत, अपघाताची पर्वा न करता चालत आपल्या गावी निघालेले दिसत आहेत.
पोलिसांकडे गावी जाण्यासाठी फॉर्म भरले, वैद्यकीय तपासणी झाली असून सर्वच जण कोरोना निगेटिव्ह आहेत व तसे प्रमाणपत्र देखील आहे परंतु गाडी कधी सुटणार, कुठून सुटणार याची काहीच माहिती मिळत नसल्याने आणि जरी गाडी सुटत असली तरी त्याच्या फेऱ्या मर्यादित असतील त्यात आपला नंबर कधी येईल या विचाराने अस्वस्थ होवून हे मजूर गावी जाण्यासाठी निघाले आहेत.
मुंबई, ठाण्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी परत पाठविण्यासाठी श्रमिक रेलवे गाड्यांची व्यवस्था सरकारतर्फे करण्यात आली आहे, परंतु काही दिवसांपूर्वी वांद्रे स्थानकाच्या बाहेर लोटलेली गर्दीची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी या श्रमिक रेलवेगाड्यांच्या वेळा तसेच कुठून सुटणार याबाबत प्रशासनातर्फे गुप्तता पाळली जात आहे.