<
ठाणे(प्रतिनीधी)- लॉकडाउनच्या काळात शहरातील विविध भागात असणाऱ्या भुकेल्यांना अन्नदान करण्यासाठी अनेक संघटनांचे हात पुढे येत असून, यात कृती फाऊंडेशन देखील कुठंही कमी पडताना दिसत नाहीये. लॉकडाउन मुळे निराधार तसेच रोजंदारीवर काम करणारे कामगार यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला.
हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन शासनाने केले आहे. या आवाहनाला कृती फाउंडेशनने प्रतिसाद देऊन गरजूंच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम करत २५ गरजू कुटुंबाना किराणा किट देत मदतीचा हात दिला. सदर उपक्रम फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष कपिल महाजन, वैशाली महाजन यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला. कपिल महाजन हे बीएसआय तर्फे सोशल रेस्पॉन्सिबिलिटी टीम लीडर आहेत. यापूर्वीच त्यांनी पीएम केअरला डोनेशन केले असून, ते बरेच सामाजिक उपक्रम बीएसआय साठी राबवित आहेत. कृती फाऊंडेशचे अन्य ठिकाणी देखील मोठया प्रमाणात गरजुंना मदतीचा हात देण्याचे उपक्रम सुरु आहेत.
मुंबई आणि ठाण्यात सध्या कोरोना फोफावत चालला आहे.अती स्फोटक, अति संवेदनशील आणि प्रतिकूल परिस्थिती असून सुद्धा गेले ३-४ दिवस गरजूंचा सर्वे करून निवडक २५ लाभार्थी ज्यात बांधकाम मजूर, माथाडी कामगार, रस्त्यावर बॅग विकणारी मुले, आदिवासी स्त्रीया, रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि घरकाम करणाऱ्या स्त्रिया ज्यांना गेले दीड महिने काम बंद असल्याने पगार मिळाला नव्हता, अश्यांचा समावेश करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत व शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करत सदरचा उपक्रम राबविण्यात आला. येत्या महिन्यात आणीबाणीची परिस्थिती पाहता जास्तीत जास्त गरीब कुटुंबाना अन्नधान्य वितरित करण्याचा मानस असल्याचे फाउंडेशनचे वैशाली महाजन यांनी यावेळी बोलून दाखविला. सदर उपक्रमाला डि.टी. महाजन, कुसुम घोगले यांचे सहकार्य लाभले तर दिपाली अहिरराव, किमया महाजन, अथर्व महाजन उपस्थित होते.