उस्मानाबाद, दि.10:- आज संपूर्ण उस्मानाबाद जिल्हावाशीयामध्ये एक प्रकारचा उत्साह संचारला होता; तो उत्साह म्हणजे आपला उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये असल्याचा एक सार्थ अभिमान होता तर आपला जिल्हा कायमस्वरूपी ग्रीन झोनमध्ये मध्ये ठेवण्याचा व त्यासाठी प्रशासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचा निर्धार नागरिकांनी केलेला दिसून येत होता.
आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या उस्मानाबाद केंद्रावरून जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या जिल्ह्यात कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाला करावयाचे सहकार्य व नागरिकांनी स्वतःहून पालन करावयाच्या नियमांची माहिती व शपथ जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली. उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम उस्मानाबाद जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांनी ऐकला जिल्हाधिकारी मुंडे यांनी दिलेली शपथ त्यांनी घेतली व उस्मानाबाद जिल्हा कायमस्वरूपी ग्रीन झोन मध्ये ठेवण्याचा निर्धार केला.
जिल्ह्यातील लाखो नागरिकांनीभौतिक अंतर ( फिजिकल डिस्टन्ससिंग) ठेवूनआपल्या घराच्या गॅलरीतून, घराच्या अंगणातून, शेतातुन व ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणाहून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या समवेत शपथ घेऊन या कार्यक्रमाला व जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्याच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कोरोना चा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर समाजातील प्रत्येकाने मनापासून यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. जिल्हा ग्रीन झोन मध्येच राहण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून प्रशासनाला माहिती देऊन नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी सूचित केले. हजारो नागरिकांनी न्यूज ओन एअर ( newsonair) हे एप्लीकेशन गुगल प्ले स्टोअरमधून आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून या कोरोना विरुद्ध च्या लढाईत प्रशासनाला सहकार्य करण्याचे करण्याची शपथ घेतली. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहून जिल्हाधिकारी यांची आकाशवाणीवरून प्रसारित होणारी शपथ घेतली. उस्मानाबाद जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील हजार लोक या कार्यक्रमात सहभागी होऊन कोरोनामुक्तीचा निर्धार केला.