मुलुंड : शेखर चंद्रकात भोसले
काल रात्री १-१५ वाजता भांडुपमधील हनुमान टेकडी परिसरातील सविता सिंग यांच्या घराच्या पत्रावरून घरात एक हरण पडल्याची घटना घडली. पॉज-मुंबई ए.सी.एफ.चे स्वयंसेवक हसमुख मारुती वळंजू यांना याची खबरी मिळताच, वनविभागाचे वनपाल रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे कर्मचारी आणि प्राणीमित्र संघटनेच्या स्वयंसेवकांनी सदर हरणाला पकडून पुढील वैद्यकीय उपचारासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या हनुमान टेकडी परिसरातील सविता सिंग यांच्या घरातील सर्व जण रात्री सव्वा एक वाजता गाढ झोपेत असताना त्यांना घरात काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. या आवाजाने जाग आलेल्या घरातल्या सदस्यांनी लाईट लावताच घराच्या छताच्या पत्रातून एक हरिण आत पडलेले नजरेस आले. सुरुवातीला भीतीने गांगरून गेलेल्या सविता सिंग यांनी थोडे धीट होवून आजूबाजूच्या रहिवाशांना जागे केले व घडलेली घटना सांगितली. तेथील रहिवासी आबा कुबल यांनी वन्य प्राणीमित्र संस्था पॉज-मुंबई ए.सी.एफ. यांच्या दूरध्वनी क्रमांकावर फोन करुन ही माहिती दिली. सदर माहिती मिळताच पॉज-मुंबई ए.सी.एफ. चे स्वयंसेवक हसमुख मारुती वळंजू घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी ताबडतोब वनविभागाला कळवले. वनविभागाचे वनपाल रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी दाखिल झाले व घाबरलेल्या त्या हरणाला प्राणीमित्र संघटनेच्या स्वयंसेवकांच्या साहाय्याने रात्री १-४५ वाजता पकडण्यात यश मिळविले. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी व उपचारासाठी हरणाला वनविभागाने आपल्या सोबत नेले.
या विभागांमध्ये हरण डोंगरावरून पडलेल्याची ही दुसरी घटना असून याआधी २२ एप्रिल रोजी टेकडीवरून पडल्यामुळे एक हरण मृतावस्थेत आढळले होते, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक सुनिष सुब्रमण्यन कुंजू यांनी सांगितले. १५ दिवसात चितळ डोंगरावरून घसरून पडल्याची ही दुसरी घटना असल्याचे स्थानिकांनी सांगितले.