पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने निधीची उपलब्धता
यवतमाळ, दि.10 : लॉकडाऊनच्या काळात सर्व दैनंदिन व्यवहार बंद असल्यामुळे लोकांच्या हाताला काम नाही. अशा लोकांना दोन वेळेच्या जेवणाची सोय व्हावी या उद्देशाने शासन, प्रशासन, सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती आदींच्या मदतीने धान्य किट वाटप करण्यात येत आहे. मात्र लॉकडाऊनचा कालावधी जसजसा वाढत आहे, त्याकरीता अजून धान्याची गरज वाटू लागली आहे. ही गरज लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रातील गरीब व गरजू तसेच शिधापत्रिका नसलेल्या लोकांना धान्य किट देण्यात येणार आहे. यासाठी विविध स्तरातून निधी गोळा करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्रात धान्य किट उपलब्ध करून देण्याकरिता निधी उभारण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड प्रयत्नरत होते. याबाबत काही मोठ्या कंपन्या, पतसंस्था, शैक्षणिक संस्था, वैयक्तिक देणगीदाते यांना पालकमंत्र्यांनी संपर्क करून आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन खात्यात 15 लाख रुपये जमा झाले. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार यांना देखील निधी उभारण्याबाबत पालकमंत्र्यांनी निर्देश दिले व या माध्यमातून जवळपास 2 कोटी रुपये जमा होणार आहेत. यात जिल्हा परिषद वर्ग 3 पर्यंतचे शिक्षक व कर्मचारी प्रत्येकी एक हजार तर वर्ग 4 व कंत्राटी कर्मचारी प्रत्येकी 500 रुपये पगारातून कपात करून देणार आहेत. याकरीता जि.प. अध्यक्षा कालिंदा पवार, उपाध्यक्ष क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर, मुख्याधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त मुख्याधिकारी राजेश कुलकर्णी, सभापती श्रीधर मोहोड, विजय राठोड, राम देवसरकर, जया पोटे यांनी हा निधी उभारण्यासाठी पुढाकार घेतला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्हा परिषद पतसंस्थेचे अध्यक्ष राजुदास जाधव यांनीसुद्धा जिल्हा प्रशासनाकडे 1000 किट उपलब्ध करून दिल्या आहेत.
विशेष म्हणजे याबाबतची निविदा प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असून लवकरच धान्याच्या किट उपलब्ध होणार आहेत. सर्वप्रथम प्रतिबंधीत क्षेत्रातील गरीब व गरजूंना या किट दिल्या जातील व त्यानंतर जिल्ह्यातील राशन कार्ड नसलेल्या गरजूंना धान्य किट उपलब्ध करून दिल्या जातील. सदर किटमध्ये पाच किलो गहू आटा, एक किलो तांदूळ, अर्धा किलो बेसन पीठ, एक किलो साखर, 100 ग्रॅम चहापत्ती पॅकेट, 500 ग्रॅमचे मिर्च पावडर पॅकेट, 100 ग्रमचे हळद पावडर पॅकेट, एक किलो मीठ पुडा, एक किलो तूरडाळ, एक किलो तेलाचे सिलबंद पॅकेट, 500 ग्रॅम मटकी, 500 ग्रम चना डाळ, एक नग आंघोळीची साबण, 50 ग्रॅम गरम मसाला पॅकेट, एक नग हॅन्डवॉशचा समावेश राहणार आहे.