येत्या २ दिवसात २०० परप्रांतीय मजुरांना घरी पाठविण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयातर्फे नियोजन
चाळीसगाव – लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांची महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत मोफत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आज चाळीसगाव तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेशातील २२ मजुरांना घेऊन राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस चाळीसगाव आगारातून रवाना झाली. आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी व शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, आगार प्रमुख संदीप निकम व उपस्थितांनी टाळ्या वाजवत प्रवाश्याच्या शुभेच्छा दिल्या. सदर बस मधील प्रवाश्यांना जेवणाची पाकिटे देखील सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांच्यातर्फे वाटप करण्यात आले. या मजुरांना रावेर तालुक्यातील मध्यप्रदेश हद्दीवरील चोरवड येथे सोडले जाणार असून तेथून मध्यप्रदेश आगाराच्या बसने ते स्वगृही पोहोच करण्यात येईल. चाळीसगाव आगाराच्या बस क्रमांक MH20 BL 3410 ने या मजुरांना इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी चालक सुनील ठाकरे हे सेवा देत आहेत.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयात चाळीसगाव तालुक्यात अडकलेल्या व चाळीसगाव तालुक्यातील इतर जिल्ह्यात व राज्यात अडकलेल्या नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाईन सहाय्यता केंद्र सुरु करण्यात आले होते त्यात परप्रांतीय २४२ मजुरांची नोंदणी करण्यात आली होती. या मजुरांना देखील शासकीय अट – शर्तींच्या अधीन राहून टप्प्याटप्प्याने बसच्या माध्यमातून रवाना केले जाणार असल्याची माहिती शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी दिली.