जळगाव, दि. 11 (जिमाका) – कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. राज्यातंर्गत अडकून असलेल्या मजुर/ विस्थापित कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी व इतर व्यक्तीना राज्यातील त्यांच्या गावापर्यत पोहचविण्यासाठी विशेष भुसंपादन अधिकारी, जळगाव राजेंद्र वाघ यांची समन्वय अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली आहे. समन्वय अधिकारी राजेंद्र वाघ यांना याकामी सहाय्य करणेकामी नायब तहसिलदार, ग्रामपंचायत शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव. श्रीमती रुपाली काळे, पुनर्वसन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून दिलीप पाटील, जळगाव शहर, मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, जिल्हाधिकारी कार्यालय, आस्थापना विभागातील लिपीक शंकर ढवळे यांना नियुक्त केलेले आहे.
नियुक्ती करण्यात आलेले समन्वय अधिकारी यांनी जळगाव जिल्ह्यात अडकलेल्या व मुळ गावी जाण्यास इच्छूक असलेल्या मजूरांना/विस्थापित कामगारांना, यात्रेकरु, विद्यार्थी व इतर व्यक्तींना त्यांच्या इच्छीत स्थळी सोडण्यासाठी सर्व संबंधित तहसिलदार व सर्व संबंधित महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख, यांचेशी समन्वय/संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करावी. सदर कामगिरीत हलगर्जीपणा किंवा सुचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्य्वस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.