जळगाव.दि.11 (जिमाका) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग,आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालय, मुंबई यांचेकडील 8 मे 2020 च्या आदेशान्वये भारतीय नागरीक बाहेर देशात अडकलेले आहेत. त्यांना भारतात परत आणण्याबाबतची व्यवस्था भारत केंद्र सरकारमार्फत करण्यात येत असून अशा नागरिकांना 14 दिवस कॉरंटाईन करण्याबाबत व त्यांची माहिती शासनास सादर करण्यासाठी नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्हयात देशा बाहेरून येणाऱ्या नागरिकांना कॉरंटाईन करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. नंदनकुमार यांची नियुक्ती केलेली आहे.
श्री. नंदनकुमार यांना सहाय्यक म्हणून लेखाधिकारी अलेप श्री. नितीन उंबरकर, सहाय्यक स्थापत्य अभियंता श्री. सौरभ अरविंद पाटील, श्री. पवन रविंद्र पाटील, कनिष्ठ अभियंता श्री. योगेश अहिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ लिपीक श्री. अरविंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
नियुक्त अधिकारी /कर्मचारी यांना बाहेर देशातून जळगाव जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्ती/नागरिक यांची माहिती शासनाकडून प्राप्त होताच तात्काळ संबंधित नागरिकांशी संपर्क साधून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,जळगाव येथे कोरोना विषाणूच्या अनुषंगाने आवश्यक ती वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व त्यांना आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या ठिकाणी 14 दिवस कॉरंटाईन करण्याची कार्यवाही करण्यात यावी. बाहेर देशातून आलेले नागरिक परस्पर त्यांच्या घरी जाणार नाही याची गांभिर्याने दक्षता नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावयाची आहे. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ.अविनाश ढाकणे यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.