मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
विक्रोळी परिसरात एकाच दिवशी दोन कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला असून त्यामध्ये विक्रोळीतील एका दाताच्या प्रसिद्ध डॉक्टराचा समावेश आहे तर गेल्या २४ तासांत विक्रोळी परिसरात एकुण ८ कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे.
विक्रोळी येथील टागोरनगर विभागात या ५९ वर्षीय दातांच्या डॉक्टरचा दवाखाना फार पूर्वीपासून चालू होता. काही दिवसांपूर्वीच या डॉक्टरला कोरोना संबंधित लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचाराकरिता पवईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा आज सकाळी मृत्यू झाला आहे.
तसेच विक्रोळी टागोरनगर ग्रुप नंबर एक ह्याठिकाणी राहणाऱ्या ७२ वर्षीय वृद्ध व्यक्तीला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचाराकरिता पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाल्याने विक्रोळीतील टागोरनगर परिसरात खळबळ माजली आहे.