२ लाख ५८ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन, ३ कोटी ८७ लाखांचा दंड
गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई, दि.११ – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी ३,३२,८४३ पासचे वाटप पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच २,५८,७९२ व्यक्तींना क्वॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १० मे या कालावधीत कलम १८८ नुसार १,०३,३४५ गुन्हे नोंद झाले असून १९,६३० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ८७ लाख ५० हजार ४९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
कडक कारवाई
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दृष्टप्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.
या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या २०७ घटना घडल्या. त्यात ७४७ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
१०० नंबर-८८ हजार फोन
पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर ८८,६२३ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.
तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे अशा ६६२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २,५८,७९२ व्यक्ती Quarantine आहेत, अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२९१ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५५,७८४ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
पोलीस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ४, पुणे १, सोलापूर शहर १, नाशिक ग्रामीण १ अशा ७ पोलीसवीरांना आपला जीव गमवावा लागला. ९१ पोलीस अधिकारी व ७९६ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
रिलिफ कँम्प
राज्यात एकूण ४०५० हजार रिलिफ कॅम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास ३,९५,५८८ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. या काळात विविध प्रकारच्या अफवा पसरत आहेत. तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.