नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
मालेगाव, दि. 11 (उमाका वृत्तसेवा) : कोविड-19 च्या अनुषंगाने शासनाच्या सुधारित नियमावलीनुसार रुग्णांमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांचा सूक्ष्म अभ्यास करुन त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याच्या सुधारित नियमावलीनुसार मोठ्या प्रमाणात रुग्णांना घरी पाठविण्यात येत आहे. असे असले तरी होम आयसोलेशनमधील रुग्णांना देण्यात आलेल्या सूचनांचे त्यांनी काटेकोर पालन करणे अत्यंत गरजेचे असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज केले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासह रुग्णांना कोरोना केअर सेंटर मध्ये दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री.सूरज मांढरे आज मालेगाव येथे आले होते. त्यांच्यासमवेत सहायक जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, उपायुक्त (प्रशासन) नितीन कापडणीस, तहसिलदार चंद्रजीत राजपूत आदी उपस्थित होते.
पावरलूम मालकांसह व्यापाऱ्यांनी मजुरांची काळजी घ्यावी : कृषिमंत्री दादाजी भुसे
शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पावरलूमवर काम करणारा मजूर वर्ग आहे. यातील सर्वाधिक मजूर हे स्थानिक असून त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह हा त्यांच्या मजुरीवर अवलंबून आहे. बाराही महिने या मजूरवर्गावर आपला व्यवसाय सुरू असतो, त्यामुळे पडत्या काळात त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. त्यासाठी पावरलूम मालकांसह व्यापाऱ्यांनी त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. यासाठी पावरलूम मालक व व्यापारी यांची एक समिती गठित करण्याच्या सूचना राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिल्या. शासकीय विश्रामगृहात आयोजित पावरलूम मालक, व्यापारी व मजूरांशी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या समितीमार्फत मजूरांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वांनी सकारात्मकता दर्शवून पाठिंबा दर्शविला. तर रमजान हा महिना जकात वाटपाचा महिना असल्यामुळे याची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होईल असा एकत्रित सूर याठिकाणी उमटला.
सर्वप्रथम जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी शहरातील कॅन्सर रुग्णालयाची पाहणी केली. त्याठिकाणी असलेल्या आयसीयू कक्षासह रुग्णांच्या विलगीकरणासाठी आवश्यक सुविधांची माहिती घेऊन त्याठिकाणी उपलब्ध असलेली साधनसामग्रीची पाहणी करुन व्हेंटिलेटरची सुविधा तत्काळ कार्यान्वित करण्यासाठी संबंधितांना सुचना केल्या. त्यानंतर लगतच्या सहारा रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या, व त्याच रुग्णालयातील वरच्या मजल्यावर रुग्णांना विलगीकरणासाठी आवश्यक असलेल्या मोकळ्या जागेची पहाणी करुन त्याची उपयुक्तता व त्याठिकाणी करावयाच्या सोयी सुविधांबाबत महानगरपालिका प्रशासनास सूचना केल्या. तसेच रुग्णालय तात्काळ कार्यान्वित करुन रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्याबाबतचे निर्देशही त्यांनी दिले. शहरातील पश्चिम भागात असलेल्या एम.एस.जी.महाविद्यालयात साकारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरसह डेडीकेटेड कोविड सेंटर्सला देखील त्यांनी आज भेट दिली. त्याठिकाणी असलेल्या रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेऊन उपस्थित परिचारिकांची देखील त्यांनी विचारपूस केली. तेथे ठेवण्यात आलेल्या रजिस्टरच्या नोंदी जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी स्वत: तपासून दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. उपस्थित डॉक्टर्स व नर्सेस यांच्याशी चर्चा करुन रुग्णालयात उपलब्ध असलेल्या मास्क व सॅनिटायझर्स तसेच रुग्णालयातील स्वच्छता व रुग्णांना पुरविण्यात येणारा आहार व स्वच्छ पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सोयी सुविधांची माहिती जाणून घेतली.
रुग्णांची गैरसोय होणार नाही असे पूर्वनियोजन आवश्यक
रुग्णांची गैरसोय होणार नाही, याकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबत सर्वाधिकार स्थानिक स्तरावर प्रदान केलेले असताना सुविधांबाबत रुग्णांच्या तक्रारी प्राप्त होतात, ही अत्यंत खेदाची बाब आहे. यापुढे रुग्णांच्या तक्रारी आल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित केली जाईल असेदेखील जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी नमूद केले.