जळगाव. दि. 12 (जिमाका) – कापूस हे जळगाव जिल्ह्यातील महत्वाचे नगदी पिक आहे. शासनाने कापूस बीजी-1 या पाकिटाची किंमत 635 रुपये तर बीजी-2 या वाणाच्या पाकिटाची किंमत 730 रुपये अशी निर्धारित केली आहे. कापूस बियाणे जरी बाजारात लवकर उपलब्ध झाली असली तरी शेतकऱ्यांनी बागायती कपाशीची लागवड 1 जूननंतरच करावी. असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
कपाशीला 21 ते 37 अंश सेल्सिअस तापमान मानवते आणि मे महिन्यात 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान असल्याने या कालावधीत कपाशीची लागवड (पेरणी) केल्यास या पिकावर मर व गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. जास्त तापमानाचा विपरीत परिणाम होवून पिकांची अंकूरण कमी होते. परिणामी नवीन अंकूर वाळतात जमिनीलगतच्या खोडावर स्कॅचिंग होवून संपूर्ण रोप लाल होवून रोपाची वाढही खुंटते.तरी कापूस बियाणे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांचे बागायती कापूस लागवडीविषयी योग्य ते प्रबोधन करावे. वियाणे विक्रेत्यांनी शासनाच्या परवानगीशिवाय कापूस बियाणाची विक्री शेतकऱ्यांना केल्यास संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. असा इशारा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे.