जळगाव(प्रतिनिधी)-कोरोना विरूद्धचा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सर्वोत्परीने प्रयत्नशील आहे. परंतु शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय बिकट, गंभीर व चिंताजनक बनत चालली आहे.
प्रशासनाच्या जोडीला अनेक सेवाभावी संस्था देखील खांद्याला खांदा लाऊन आपापल्या परीने काम करताना दिसत आहेत. जनतेचा बेफिकीरपणा, बेशीस्त, दिवसेंदिवस वाढतच आहे. नागरिकांना समजावून, कायद्याचा वापर करून, प्रसंगी दंडूकेशाही इत्यादी चा वापर करून ही जनता प्रशासनाला सहकार्य करीत नाही. परीणामी शहर किंबहुना जिल्हा रेडझोनमध्ये आलाय. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरातील विविध भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्या क्षेत्रातील रहीवाश्यांना घराबाहेर जाता येत नाही. तसेच बाहेरच्या लोकांना त्या क्षेत्रात प्रवेश दिला जात नाही. या परीस्थितीत प्रतिबंधित क्षेत्रातील कुटुंबियांचे हाल होत आहेत. अश्यातच कृती फाऊंडेशनने आतापर्यंत कोरोनाच्या आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या अनेक घटकांना मदतीचा हात दिलेला आहे. शहरातील जोशी पेठ व मारूती पेठ या प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांसाठी “कृती फाऊंडेशन”ने मदत करावी अशी विनंती मनपाच्या वतीने करण्यात आली होती.
त्या आव्हानाला तात्काळ प्रतिसाद देत महापालिका आयुक्त सतिश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार “कृती”ने प्रतिबंधित क्षेत्रातील 20 कुटूंबियांना महीनाभर पुरेल अशा दैनंदिन जीवनातील गरजेच्या किराणा सामानाचे वाटप केले. प्रसंगी कृती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत महाजन, पोलीस बिनतारी संदेश विभागाचे तसेच फाऊंडेशनचे कार्यध्यक्ष अमित माळी, सचिव जी.टी.महाजन, वैद्यकीय आघाडी प्रमुख डॉ. श्रद्धा माळी, डॉ. श्रेयस महाजन, माधुरी महाजन यांच्यावतीने महानगरपालिकेच्या प्रभाग दोनचे अधिकारी सुभाष मराठे, एस.एस.पाटील, प्रकल्प अधिकारी शालिग्राम लहासे, यांच्याकडे हे किराणा सामानाचे किटस् प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना वाटप करण्यासाठी सुपूर्द करण्यात आले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उध्दव सामुद्रे, अमोल महाजन यांनी आर्थिक सहकार्य केले. महानगरपालिकेचे बालाजी ओळंबे, विठ्ठल इंगळे, भानुदास वानखेडे, रूग्ण सेविका, आशा वर्कर व इतर कर्मचारी उपस्थित होते. कृती फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे महानगरपालिकेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले तर सत्यमेव जयते न्यूज चे मुख्य संपादक दिपक सपकाळे, जिल्हा विश प्रतिनिधी चेतन निंबोळकर यांचे विशेष सहकार्य लाभले.