मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
मुंबई उपनगरातील पालिकेच्या “एस” विभाग क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत ३१० पेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याने या वैद्यकीय आणीबाणीला रोखण्यासाठी पालिका एस वार्डचे सहाय्यक आयुक्त संतोष धोंडे यांच्याकडे काहीही ठोस ऍक्शन प्लॅन नसल्याने व काहीही कडक उपाययोजना पालिका प्रशासनामार्फत राबविण्यात येत नसल्यामुळे भांडूपमधील रहिवासी संतप्त झाले असून अकार्यक्षम कारभाराबद्दल सहाय्यक आयुक्त संतोष धोंडे यांच्या बदलीची मागणी भांडूप परिसरात जोर धरू लागली आहे.
मुंबईतील भांडूप, पवई, कांजूर, इत्यादी परिसराचा समावेश असलेल्या पालिकेच्या एस वार्डात या घडीला ३१० च्या पूढे कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला असूनही जागोजागी भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या बहाण्याने नागरिक बिनधास्त घराबाहेर पडताना दिसत आहेत. यावर प्रशासनाचे लक्ष नसल्याने व पोलिसांना देखील योग्य ते निर्देश प्रशासनातर्फे मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर माणसांची वर्दळ आढळून येत आहे त्यामुळे कोरोनाचा फैलाव भांडुप एस विभागात वाढत आहेत. बहुतांश रुग्णांची हेळसांड होत असल्याचे संतापजनक प्रकार येथे समोर येत आहेत. कोरोनाची चाचणी करण्याकरिता स्वतःहून रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांकडे कुणीही ढुंकूनही पाहत नसून, तासनतास त्यांना ताटकळत ठेवले जात आहे. तर रुग्णालयात उभारण्यात आलेल्या क्वॉरंटाइन कक्षात मूलभूत सुविधांचा अभाव असून स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. आरोग्य सेविकांना जीवनावश्यक पीपीई किटचे वाटप देखील करण्यात आले नाही. संसर्ग टाळण्यासाठी कचऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे परंतु याबाबत देखील अधिकाऱ्यांना कोणताही आदेश दिला जात नाही आहे. या व अश्या अनेक समस्येस पालिकेच्या एस वार्ड सहा. आयुक्तांचा हलगर्जीपणाच जबाबदार असल्याने कोरोणाचा फैलाव कसा थोपवणार, असा संतापजनक सवाल रुग्णांकडून व भांडूपमधील नागरिकांकडून केला जात आहे.
भांडुप विधानसभा क्षेत्रात सर्व पक्षांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करूनही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्व लोकप्रतिनिधींनाच धक्का बसलाय. मात्र, मनपा प्रशासनाच्या आरोग्य विभागाची यंत्रणा पूर्णता: कुचकामी ठरल्याने बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सगळेच हतबल झाले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
एस वार्डचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे हे नागरिकांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करीत नाहीत तर “एस” विभाग महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची दैनंदिन माहिती (अपडेट) देखील दिली जात नाही आहे. कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी एस वार्डचे सहाय्यक आयुक्त पळ काढत असल्याचे भांडुपकर आता उघडपणे बोलू लागले आहेत.
याच पार्श्वभूमीवर बेजबाबदार कारभार, कामचुकारपणा व विभागात कोरोनाला रोखण्यास अयशस्वी ठरल्यामुळे भांडुप एस विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अश्या आशयाचे एक पत्र सामाजिक कार्यकर्ते अनिल म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.