जळगाव : एसडी-सीड जिल्ह्यातील गुणवंत, आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे. जिल्ह्यात बहुतांश जिद्दी व गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांना परिस्थितीमुळे त्यांना अनेक समस्या येतात. त्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे तसेच या पिढीने जागतिक पातडीवर आव्हानांशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम हा व्यापक दृष्टीकोन समोर ठेवून वेगवेगळे उपक्रम एसडी-सीड मार्फत राबविले जात आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना जर आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांच्या अंगी मुल्याशिक्षण रुजून ते विकसित झाले पाहिजे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्याला मुल्याशिक्षणाचे महत्व कळावे या उद्देशाने एसडी-सीड जळगाव यांच्या तर्फे विद्यार्थ्यांसाठी “मूल्यशिक्षण” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन महाराणा प्रताप माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय, जळगाव येथे करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून जी. टी. महाजन हे होते.
शिक्षणातून विद्यार्थ्यांचा ज्ञानात्मक, भावनात्मक व क्रियात्मक विकास साधायचा, त्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवायचे आणि त्यांना देशाचे आदर्श नागरिक करावयाचे ठरविले तर त्यांच्यामध्ये विशिष्ट मुल्ये संस्कारित करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन श्री महाजन यांनी कार्यक्रमप्रसंगी काढले.
त्यांनी सागितले की, स्व:ताच्या पलीकडे जाऊन इतरांच्या दुःखाचा विचार करणे, दुसऱ्याच्या सुखाने आनंदित होणे, दुसऱ्याच्या दु:खाला कळवळने, इतरांचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करणे यासाठी काही गोष्टी अंगीकारणे म्हणजेच मानवी मूल्यशिक्षण होय. दिवसेंदिवस आवश्यक अशा जीवनमुल्यांचा ऱ्हास होत असल्यामुळे अनेक समस्या वाढत आहे. त्यामुळे शिक्षणातून जीवनावश्यक मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये परिणाम कारक रित्या रुजविले जावेत हा विचार पुढे येत आहे. आज नैतिक शिक्षणावर जास्त भर देण्याची गरज वाढत आहे.
त्यांनी विद्यार्थी जीवनातील निवळक दहा मुल्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. त्यात राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्र भक्ती, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, श्रम प्रतिष्टा, वैज्ञानिक दृष्टीकोन, सर्वधर्म सहिष्णुता, स्री-पुरुष समानता, सौजन्यशीलता आणि संवेदनशीलता या मुल्यांचा उपयोग करून आपण एक सुसंस्कारित, सुजाण नागरिक कसे बनता येईल तसेच विद्यार्थ्यांच्या अंतकरणात सद्वर्तन कसे बिंबवता येईल हे समजून सांगितले.
कार्यक्रमाला महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. साधना शर्मा, श्री. डी. एस. पाटील, एसडी सीड समन्वयक प्रवीण सोनवणे व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. साधना शर्मा व विद्यालय व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी-सीड गव्हार्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.