मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
मुंबई महापालिका आयुक्तांनी बुधवारी रात्री एक पत्रक काढून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि हार्डवेअरची दुकाने खुली ठेवण्यास अटीसापेक्ष परवानगी दिल्यानंतर आजपासून मुलुंडमधील प्रत्येक रस्त्यावरील एक याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरची दुकाने चालू झालेली आढळून आली आहेत. नागरिक देखील या संधीचा फायदा घेत दुकानासमोर रांग लावून आवश्यक ते सामान खरेदी करताना दिसत होते. खूप दिवसांपासून हार्डवेअरची दुकाने बंद असल्याने ज्या लोकांच्या घरातील किंवा हौसिंग सोसायटीतील बंद पडलेल्या ट्युबलाइट्स, बल्ब, पंखे, फ्रीज, पाण्याचे पंप व इतर विजेची उपकरणे, काही यांत्रिक मशीन या सर्वांचे सुटे भाग व हार्डवेअरचे सामान मिळायचा मार्ग मोकळा झाल्याने रहिवाशांनी देखील सुटकेचा निःश्वास सोडला व त्यामुळे आजपासून चालू झालेल्या हार्डवेअरच्या दुकानासमोर नागरिकांनी दुकानाबाहेर रांगा लावून वस्तू खरेदी केल्या.
तसेच इलेक्ट्रॉनिक दुकाने सुरू झाल्यामुळे कंप्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल, चार्जर, एअरफोन, इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे सुटे भाग घेण्यासाठी नागरिक घराबाहेर पडलेले व या दुकानांबाहेर शिस्तीत रांगेत उभे असलेले नजरेस आले. ही दुकाने सुरू झाल्यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला आनंद झाला असून गेल्या ४५ दिवसांत बिघाड झालेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे आता दुरुस्त होण्यास कोणतीही अडचण राहणार नसल्याने घरातून ऑफीसचे काम करण्यातील अडथळा दूर झाला आहे.