जळगाव, दि.12 (जिमाका) – गेल्या तीन दिवसांत जळगाव जिल्ह्यातून मध्यप्रदेश राज्याच्या चोरवड सीमेपर्यत 69 बसेसमधून 1518 प्रवाशी तर छत्तीसगड राज्याच्या देवरी सीमेपर्यत 5 बसेसमधून 110 याप्रमाणे 74 बसेसमधून 1628 प्रवाशांना सोडण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांतून आज एका दिवसात मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्याच्या सीमेपर्यंत तर जिल्ह्याबाहेर (नागपूर) 946 कामगारांना वैद्यकीय तपासणी करून 43 एसटी बसेसमधून चोरवड, पळासनेर या मध्यप्रदेश राज्याच्या सीमेपर्यंत तर एका बसमधून छत्तीसगड या राज्याच्या सीमेपर्यंत व नागपूरपर्यंत रवाना करण्यात आल्याची माहिती एस.टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी दिली.
यासाठी त्यांना महसुल, पोलीस आणि परिवहन विभागाची मदत झाली. जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परराज्यातील मजूर, कामगार यांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही व खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले होते. त्याप्रमाणे संबंधित तालुक्यांचे तहसीलदार यांनी पायी जाणाऱ्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांतील मजुरांना बससेवा उपलब्ध करून दिली. या नागरिकांना फूड पॅकेट देवून रवाना करण्यात आले. तत्पूर्वी सोशल डिस्टन्सिगचे पालन, आरोग्य तपासणी, मास्कचा वापर या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्यात आली.
यासाठी एसटी महामंडळाच्या जळगाव आगारातून 9 बसेस, जामनेर 3 बसेस, चाळीसगाव 2 बस, अमळनेर 2 बस, रावेर 9 बसेस, भुसावळ 12 बसेस, एरंडोल 1 बस,चोपडा 2 बस याप्रमाणे जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांतून 40 बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या. तर जळगाव येथून नागपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी तीन बसेसमधून 66 प्रवासी रवाना करण्यात आले. याप्रमाणे आज जिल्ह्यातील 43 बसेसमधून 946 प्रवासी बाहेर जिल्ह्यात व राज्याच्या सीमेपर्यंत रवाना करण्यात आले.
तर गेल्या तीन दिवसांत जळगाव जिल्ह्यातून मध्यप्रदेशच्या चोरवड सीमेपर्यत 69 बसेसमधून 1518 प्रवाशी तर छत्तीसगड राज्याच्या देवरी सीमेपर्यत 5 बसेसमधून 110 याप्रमाणे 74 बसेसमधून 1628 प्रवाशांना सोडण्यात आल्याचेही श्री. देवरे यांनी सांगितले.