जळगाव-(प्रतिनिधी)- जगभरात कोविड संक्रमणाने थैमान घातले असतांना या संदर्भातील बातम्या जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रिंट व इलेक्टॉनिक, ऑनलाईन डिजिटल मीडिया कसोशीने काम करत असतांना काही प्रसार माध्यम कोरोनाच्या बातमीचा विपर्यास करत जिल्हा हादरला, आता हे प्रतिबंधित क्षेत्र, अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण,यंत्रणा हादरली अशा बातम्या प्रसिद्धी करत असल्याने जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. पत्रकारितेत सामाजिक बदलाची ताकद आहे म्हणून प्रसार माध्यमांनी कोरोनाच्या बातम्या प्रसिद्ध करतांना वास्तविकता व सकारात्मकता दाखवावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केले आहे.
प्रसार माध्यमे सध्या संक्रमण अवस्थेतून जात आहे. या अवस्थेमुळे माध्यमांमध्ये अगतिगता, अस्थिरतेच वातावरण आहे. मोठ्या प्रसार माध्यमातील कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 ते 40 टक्के कपात केली आहे तरी देखील आमचे पत्रकार बांधव जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या बातम्या घेण्यासाठी धडपडतांना दिसत आहे. मुंबईत पन्नासच्या वर पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह झाले तरी देखील कुठल्याच पत्रकाराने आपले काम थांबविल्याचे कानावर नाही.
कोरोनाची बातमी करतांना अपुऱ्या माहितीवरून, गैरसमज निर्माण करणारी सनसनाटी बातमीदारी न करता, पत्रकारांची भूमिका समाजाला दिशादर्शक आणि सामाजिक सुधारणा घडविणारी असावी ज्यातून सकारात्मक पत्रकारिता उभारी घेईल.
येणाऱ्या काळात कोरोनाच्या बातम्या देतांना पत्रकारांनी समाजातील एक जबाबदार घटक म्हणून वास्तवादी व सकारात्मक बातम्या देण्यावर भर द्यावा तसेच कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची बातमी देऊन समाजात उत्साहीत वातावरण निर्माण करावे असे अवाहन महाराष्ट्र पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केले आहे.