१ हजार ४७७ मजुरांचा कोल्हापूरहून नागौरकडे प्रवास
कोल्हापूर, दि. 12 : जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घेवून श्रमिक विशेष रेल्वे राजस्थानमधील नागौरकडे आज सायंकाळी 6 वाजता रवाना झाली. एकूण रेल्वेच्या 24 बोगीमधून 1 हजार 477 मजूर, प्रवासी नागौरकडे मार्गस्थ झाले. खासदार धैर्यशील माने यांनी गुलाब पुष्प देवून तर खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी जेवणाचे किट देवून पुन्हा जिल्ह्यामध्ये परत येण्याचे आवाहन केले. प्रवाशांनीही खासदार श्री.माने यांच्यावर पुष्पवृष्टी करुन कृतज्ञता व्यक्त केली.
राजस्थान शासनाकडून मंजुरी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध तालुक्यांमधील मजुरांची यादी करुन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून नागौरकडे जाणाऱ्या रेल्वेचे नियोजन केले. कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या बस, राज्य परिवहन महामंडळाच्या बस तसेच विविध शैक्षणिक संस्थांच्या महाविद्यालयीन विद्यार्थी वाहतूक बसमधून विविध तालुक्यात असणाऱ्या मंजुरी मिळालेल्या कामगारांना छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे आणण्यात आले. याठिकाणी प्रवासाची रेल्वे तिकीटे त्यांना देण्यात आली.
थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर याचा वापर करत त्यांना रेल्वेच्या बोगीमध्ये प्रवेश देण्यात आला. खासदार धैर्यशील माने यांनी दाखविलेल्या हिरव्या झेंड्यानंतर जिल्ह्यातील ही श्रमिक विशेष रेल्वे राजस्थानकडे रवाना झाली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, करवीरच्या तहसिलदार शीतल मुळे- भामरे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, पोलीस उप अधीक्षक प्रेरणा कट्टे आदी यावेळी उपस्थित होते.
खासदार प्रा.मंडलिक यांनी यावेळी प्रवाशांना पाणी बॉटल आणि जेवणाच्या किटचे वाटप केले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून पाणी बॉटल तसेच उद्यासाठीच्या नाश्त्याच्या किटचे वाटपही करण्यात आले. ओसवाल ग्रुपच्या माध्यमातून राजस्थानला जाणाऱ्या प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. आपल्या गावी जावून पुन्हा लवकरच जिल्ह्यामध्ये येण्याचे निमंत्रणही खासदार श्री.माने यांनी यावेळी दिले आणि गुलाब पुष्प देवून रवानगी केली. प्रवाशांनीही खासदार श्री.माने यांच्यावर पुष्पवृष्टी करत पुन्हा येण्याचे आश्वासन दिले.
24 बोगीमधून 1 हजार 477 कामगार
करवीरमधील 315, इचलकरंजीमधील 557, शिरोळमधून 169, हातकणंगलेमधून 166, कोल्हापूर शहरातील 270 असे एकूण 1 हजार 477 कामगार रेल्वेच्या 24 बोगीमधून आपा-पल्या गावी आज रवाना झाले.
आरोग्य राज्यमंत्र्यांकडूनही निरोप
जयसिंगपूर येथील डॉ. जे.जे मगदूम आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रांगणात राजस्थानला जाणाऱ्या शिरोळ परिसरातील 169 मजुरांना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी निरोप दिला. शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजच्यावतीने 4 बसेस तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या 3 बसमधून या मजुरांना घेवून कोल्हापूर रेल्वेस्थानकाकडे रवाना झाल्या. यावेळी शिरोळच्या तहसिलदार डॉ. अर्पणा मोरे उपस्थित होत्या.
महामंडळाच्या बसमधून मजुरांचा प्रवास – विभाग नियंत्रक
लॉकडाऊनमुळे इचलकरंजी व कुरुंदवाड, पेठवडगाव, पु. शिरोली येथे अडलकेल्या व ज्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी प्रशासनाची परवानगी मिळाली आहे अशा 515 प्रवाशांना आज राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी व कुरुंदवाड आगाराच्या 23 बसेसमधून कोल्हापूर रेल्वे स्टेशन येथे सोडण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली. यामध्ये इचलकरंजी आगाराच्या 20 बस मधून 457 आणि कुरुंदवाड आगाराच्या 3 बसमधून 58 अशा 515 मजुरांचा समावेश होता.
कुरुंदवाड आगारामार्फत नृसिंहवाडी- कोल्हापूर एक बस आणि कुरुंदवाड-कोल्हापूर दोन बस सोडण्यात आल्या. तर इचलकरंजी आगारामार्फत इचलकरंजी येथून 13 बस, हातकणंगडले येथून 3 बस, पेठवडगाव येथून 2 बस आणि पु.शिरोली येथून दोन बस सोडण्यात आल्याचे विभाग नियंत्रक श्री. पलंगे यांनी सांगितले.