मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
आज दूपारी दिड वाजता मुंबई महानगर पालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुलूंड पूर्व येथील मिठागर रोड उच्च प्राथमिक मनपा शाळेत सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला भेट देवून तेथील रुग्णव्यवस्था व सुविधांची पाहणी केली.
मिठागर रोड येथील कोविड सेंटरमधील असुविधाबद्दलच्या अनेक तक्रारी व वीडियो सध्या सोशल मिडियाद्वारे सर्वत्र पसरत आहेत. तसेच येथील रुग्णांची संख्या देखील वाढली असल्याने येथील सुविधा व इतर सर्व गोष्टींची पाहणी करण्यासाठी आज दिडच्या सुमारास पालिकेच्या नवनियुक्त अतिरिक्त आयुक्ता अश्विनी भिडे यांनी मुलुंड मधील या कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी पालिकेचे उपायुक्त बलमवार, टी वार्डचे सहा. आयुक्त किशोर गांधी, एस वार्डचे सहा. आयुक्त संतोष धोंडे, नगरसेविका रजनी केणी, येथील कोविड सेंटरच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी रजनी जगताप इत्यादी उपस्थित होते. साधारण अर्ध्या तासाच्या या भेटीत अश्विनी भिडे यांनी संपूर्ण परिसराची, सेंटरमधील वैद्यकीय उपकरणे, सुविधा, रुग्णांशी संबंधित व्यवस्था, इत्यादी गोष्टींची माहिती घेतली व अधिकाऱ्यांना काही उपयुक्त सूचना, मार्गदर्शन केले.
महापालिकेच्या या उच्च प्राथमिक शाळेत सध्या फ़क्त ४५ विद्यार्थी शिकत असल्यामुळे भविष्यात या शाळेच्या इमारतीचा वापर पालिकेच्या सर्वसाधारण रुग्णालयासाठी करण्याचा एक विचार यावेळी पूढे आला असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समजले.