<
नंदुरबार : नागरिकांना आरोग्य विषयक सूचना देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी ‘आरोग्य सेतू आयव्हीआरएस’ सेवा सुरू करण्यात आली असून दूरध्वनी आणि मोबाईलसाठी १९२१ या टोल फ्री क्रमांकाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला १९२१ क्रमांकावर मिस कॉल करावयाचा आहे. कॉल बंद झाल्यावर त्यास या सेवेच्या माध्यमातून संपर्क साधण्यात येईल. त्यास आरोग्य सेतू ॲपशी संबंधित आरोग्य विषयक माहिती विचारण्यात येईल. दिलेल्या उत्तराच्या आधारे लघुसंदेशाच्या (एसएमएस) माध्यमातून आपल्या प्रकृतीच्या सद्यस्थिती विषयी माहिती देण्यात येईल. नंतर देखील नागरिकांना त्यांच्या प्रकृती विषयी संदेश देण्यात येतील.
जास्तीत जास्त नागरिकांना या सेवेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ही सेवा ११ भाषांमधून उपलब्ध करून देण्यात आली असून सेवेचा उपयोग करणाऱ्या व्यक्तीस त्याने निवडलेल्या भाषेत एसएमएस येणार आहे. व्यक्तीने दिलेली माहिती ‘आरोग्य सेतू’ शी जोडली जाणार असल्याने नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने सूचना प्राप्त होऊ शकतील.
जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्य विषयक सुरक्षेसाठी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि इतर कोणत्याही क्रमांकावरून संपर्क साधला गेल्यास माहिती देऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.